अमरावती - गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अप्पू कॉलनी, प्रेरणा कॉलनीमध्ये चोरट्यांनी बुधवारी (दि. 30) सहा, तर राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील न्यू स्वस्तिकनगरमध्ये एक घर फोडले. शहरात पंधरा दिवसांपासून घरफोड्यांचे सत्र सुरू आहे.
अप्पू कॉलनीमधील पुरुषोत्तम ठाकरे यांच्या घरी प्रभाकर नामदेवराव सोनढवळे हे भाड्याने राहतात. बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून सोन्याच्या दागिन्यांसह पाच हजारांची रोकड व चार घड्याळी, असा 18 हजार 100 रुपयांचा ऐवज लंपास केला. याच परिसरातील सेवानिवृत्त शिक्षक विजय रामराव लुंगे, गजानन वासुदेवराव पाटील, गोविंदप्रभू केंदले यांच्या घरातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. केंदले यांच्या घरातील कपाट फुटले. मात्र, ते बाहेरगावी असल्यामुळे चोरीला काय गेले, हे समजले नाही. राधानगर परिसरातील प्रेरणा कॉलनीमधील आदित्य बिल्डर्स अपार्टमेंटमध्ये दुसर्या माळ्यावर राहणारे पंकज सुरेश शेंडे यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सात ग्रॅमची अंगठी, चांदीचे दागिने आणि दीड हजारांची रोकड असा जवळपास 20 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला तसेच त्याच अपार्टंमेटमधील मंदा नांदुरकर यांच्या बंद घराचेही चोरट्यांनी कुलूप तोडले. राजापेठच्या हद्दीतील न्यू स्वस्तिकनगरमध्ये वसंतराव पांडे यांच्या बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी एक लाखांचा ऐवज लंपास केला. घरफोडीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी सुरू आहे.
महापालिकेच्या शाळेतही चोरी: चपराशीपुरा येथील महापालिकेच्या मराठी शाळेत चोरट्यांनी प्रवेश करून संगणक संच व प्रिंटर व अन्य साहित्य, असा 21 हजारांचा ऐवज लंपास केला. राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगरमध्ये अनंत अरविंद जोशी यांच्या घरी चोरट्यांनी चोरी करून 65 हजारांचे दागिने लंपास केले. तसेच बडनेरा नवी वस्तीमध्ये उमेश बाबुराव सुखदेवे यांच्या घरातून पाच हजारांची रोख चोरून नेली.