आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत ‘मसल पॉवर’; महिनाभरात तीनवेळा निघाल्या रिव्हॉल्व्हर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरात सध्या ‘मसल पॉवर’चा वापर वाढला आहे. अस्तित्वाच्या जाणीव ठसवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून हे प्रकार घडत आहेत. यासाठी शहरात अवैध मार्गाने शस्त्र दाखल होण्याची भीती नाकारता येत नाही. शुक्रवारी मध्यरात्री मराठा कॉलनीत दिनेश क्षीरसागरने प्रशांत मोहितेच्या दिशेने गोळ्या झाडल्या, ती रिव्हॉल्व्हर विनापरवाना असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बेकायदा शस्त्र शोधून काढण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे ठाकले आहे.

आमदार रावसाहेब शेखावत यांनी पोस्टरच्या वादातून काँग्रेसच्या माजी कार्यकर्त्याला पिस्तूल दाखवल्याचा आरोप झाला. त्यानंतर आमदार रवी राणा व उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे यांच्यातील वादात राणांनी पिस्तूल ताणल्याचा आरोप झाला. हे प्रकरण निवळत नाही तोच महापालिकेतील नगरसेविकेच्या पतीने अधिकार्‍याला मारहाण केली. यातून ‘मसल पॉवर’चे राजकारण वाढत असल्याचेच स्पष्ट होते. सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकारात जास्त वाढ झाली आहे.
334 जणांकडेच शस्त्र परवाना
शहरात सद्य:स्थितीत 334 जणांकडेच शस्त्र परवाना आहे. यामध्ये बहुतांश व्यक्ती आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काहींनी वन्यप्राण्यांपासून शेतीचे रक्षण करण्याचे कारण दिले आहे. यावर्षी पोलिस आयुक्तांनी नवीन शस्त्रपरवाना दिला नाही. असे असतानाही शहरात बेकायदा शस्त्र असल्याचे मराठा कॉलनीतील घटनेतून स्पष्ट झाले.

अस्तित्वाची लढाई
या घटना मनात विविध स्तरांवर होणार्‍या घुसमटीची प्रतिक्रिया आहे. रुपया घसरला, महागाई वाढली, आर्थिक ताण, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणार्‍या व्यक्तीचे वय या सर्वांमुळे आजूबाजूच्या गोष्टीसोबतच जुळवून घेण्याच्या क्षमता मंदावत जात आहेत. ‘मॅन’ आणि ‘मनी पॉवर’च्या या खेळात ही हिंसक कृत्ये म्हणजे ‘मसल पॉवर’चे एक उदाहरण आहे; हा मनोविकार नव्हे.
-डॉ. श्रीकांत देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ