आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीनिमित्त होणारी वृक्षतोड पूर्णत: थांबवा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पर्यावरणाचा र्‍हास थांबवण्यासाठी होळीला कचरा जाळतानाही खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे.
जाळल्या जाणार्‍या कचर्‍यात प्लास्टिकच्या पिशव्या आणि धोकादायक सामग्रीचा समावेश होत असल्याने त्यातून निघणार्‍या धुरातून आजार बळावतात, असे निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे. त्याचबरोबर होळीनिमित्त होणारी वृक्षतोड पूर्णत: थांबवण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे असल्याचे मत निसर्ग संरक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. किशोर रिठे यांनी व्यक्त केले.
दरवर्षी होळीला झाडांची बेसुमार कत्तल केली जाते. लाकडे जाळण्यासाठी होळी साजरी करण्याची परंपरा अलीकडच्या काळात वाढीस लागली आहे. मात्र, याबाबत पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या जनजागृतीमुळे वृक्षतोडीचे प्रमाण कमी झाले आहे. वृक्षतोडीस लगाम घालण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.
होलिका दहनाची परंपरा
वाईटाचा नाश करून चांगल्याचा अंगीकार करण्याचा महत्त्वाचा संदेश होळीच्या माध्यमातून दिला जातो. वर्षानुवर्षे परंपरागत पद्धतीने होलिका दहन उत्साहात साजरे केले जाते. या दिवशी गाईच्या शेणाच्या गोवर्‍या आणि लाकडे एकत्र करून त्यापासून होळी रचली जाते. संध्याकाळी पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. धार्मिक विधी पूर्ण केल्यावर होळी पेटवली जाते. या दिवशी लाकडांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो तसेच झाडांची कत्तल केली जाते. हे टाळणे गरजेचे आहे.
आरोग्याचीही हानी टाळा
होळी पेटवताना प्लास्टिक किंवा पॉलिथीनच्या पिशव्या जाळू नयेत. यामुळे निघणारा धूर आरोग्यास हानीकारक असतो. प्रसंगी कर्करोगासारखे दुर्धर आजारही यामुळे बळावतात. किशोर रिठे, निसर्ग संरक्षण संस्था.