आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक पात्रता परीक्षा पुन्हा घेण्यासाठी धरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शिक्षक पात्रता परीक्षेबाबत (टीईटी) उमेदवारांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले असून, परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, या मागणीसाठी टीईटी विद्यार्थी जनआंदोलन समितीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविषयी उमेदवारांनी या वेळी संताप व्यक्त केला.

15 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या टीईटीमध्ये राज्य परीक्षा परिषदेने अन्याय केला. दोन्ही पेपरमध्ये सुमारे 60 ते 70 प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील विचारले गेल्याचा आरोप होत आहे. या विषयी 15 जानेवारीला जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले होते, मात्र, शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडत असल्याचे समितीच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. 2013 ची टीईटी रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये सहभागी होता यावे, यासाठी परीक्षा शुल्क हे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार कमीत कमी असावे.

टीईटीच्या अभ्यासक्रमात घटक व उपघटक नमूद करण्यात यावेत. त्यानुसार प्रश्‍नांची संख्या व गुण स्पष्ट असावेत आदी विविध मागण्या या वेळी त्यांनी मांडल्या. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी मागासवर्गीय प्रवर्गाला 40 टक्के व खुल्या प्रवर्गाला 45 टक्के गुणांची अट घालावी. परीक्षेची जाहिरात देताना आदर्श प्रश्नपत्रिका (डेमो पेपर) संकेत स्थळावर देण्यात यावा आदी मागण्याही समितीने केल्या. आंदोलनात अमित अढाऊ, पंकज परनकर, गजानन भुयार, संदीप पंडित, नरेंद्र चांदणे, रूपाली तायवाडे, पूजा मिरगे, भाग्यश्री देशपांडे यांच्यासह सुमारे 150 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना या वेळी व्यक्त केल्या. आंदोलनामध्ये डी.एड, बी.एड पात्रताधारक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असावी
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता असावी, जेणेकरून उमेदवारांचे नुकसान होणार नाही. टीईटी विद्यार्थी जनआंदोलन समितीच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांची त्वरित पूर्तता व्हावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. प्रियंका भुयार, विद्यार्थिनी

अभ्यासक्रमाचा स्पष्ट उल्लेख असावा
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)च्या अभ्यासक्रमाचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीमध्ये करण्यात यावा. घटक व उपघटकांप्रमाणे प्रश्नांची संख्या व गुण स्पष्ट असावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडणार नाही. गजानन भुयार, विद्यार्थी.

शासनाने लक्ष द्यावे
एकही विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षेपासून वंचित राहू नये. त्यामुळे परीक्षेसाठी आकारण्यात येणारे शुल्क महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार असावेत. टीईटी देणार्‍या उमेदवारांच्या मागण्या लक्षात घेऊन शासनाने त्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. निवेदिता निंभोरकर, विद्यार्थिनी

नुकसानभरपाई द्यावी
42013 ची टीईटी रद्द करून या परीक्षेचे पुन्हा आयोजन करण्यात यावे. पुनर्परीक्षार्थ्यांना शासनाने भरपाई करून द्यावी. पंकज परनकर, जिल्हाध्यक्ष, टीईटी विद्यार्थी संघटन