आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरात लाखो टन कचरा साचला, प्रदूषणाचा धोका वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नागरी क्षेत्रामध्ये निर्माण होणारा घनकचरा व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी असूनही कित्येक वर्षांपासून समस्या कायम आहे.
महापालिका क्षेत्रातून दररोज जवळपास दोनशे टन घनकचरा कंपोस्ट डेपोमध्ये टाकला जात आहे. मात्र, त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा उभारण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. परिणामी, कंपोस्ट डेपोत सहा मीटरचा कचऱ्याचा थर साचला आहे.घनकचरा पर्यावरणदृष्ट्या अमरावतीच्या आरोग्यासाठी घातक ठरण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

या कचऱ्यापासून खतनिर्मिती केल्यास समस्येवर तोडगा निघून आरोग्य व पर्यावरणाची समस्येवरही कायमस्वरूपी तोडगा निघू शकते. मात्र, महापालिका कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे वारंवार सांगत असूनही याबाबतीत कृतिशून्य आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपोस्ट डेपोतील कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेस जून महिन्यातच पत्र दिले आहे. मात्र, देण्यात आलेली मुदत संपायला आल्यावरही पालिका ढिम्मच आहे.

घनकचऱ्यासोबतच सांडपाणी व्यवस्थापनाबाबत असलेली भुयारी गटार योजना अद्याप पूर्णत्वास आलेली नाही. शहराच्या केवळ एका भागातील सांडपाणी गोळा करत लालखडी येथील मलशुद्धीकरण केंद्रात त्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र, संपूर्ण शहरातील सांडपाणी तेथे पोहोचवण्यासाठी अद्याप चेंबरची जोडणी झालेली नाही. परिणामी, सांडपाणी नाल्यात वाहत असून नैसर्गिक स्रोत दूषित होत आहेत.

खतनिर्मिती प्रकल्पाचे गोलमाल
घनकचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्याची चर्चा मागील दीड वर्षांपासून आहे. नव्याने निविदा प्रक्रिया राबवल्यानंतरही अद्याप प्रकल्प आरंभ झालेला नाही. खतनिर्मितीचे घोडे अडले तरी कोठे, हे कळायला मार्ग नाही. इको फिल कंपनीला खत निर्मितीबाबत कंत्राट मिळाला आहे. करारनामा होऊन सात ते आठ महिन्यांचा कालावधी लोटला असला, तरी प्रकल्प आरंभ न झाल्याने शंका निर्माण होत आहेत.

वर्षाला ७३ हजार टन कचरा साचतो
दिवसाला २०० टन प्रमाणे वर्षभरात तब्बल ७३ हजार टन कचरा कंपोस्ट डेपोमध्ये साचतो. मागील अनेक वर्षांपासून १९ हेक्टर परिसरातील कंपोस्ट डेपोमध्ये लाखो टन कचरा साचला आहे. साचलेल्या कचऱ्यामुळे पाणी, हवा दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे; तसेच यामुळे नागिरकांचेही आरोग्य धोक्यात येत असून, याकडेही महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अमरावती शहरातील नागिरकांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील एकमेव खतनिर्मिती प्रकल्प
चांदूर बाजार नगर परिषदेने जिल्ह्यात सर्वप्रथम खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला. शहरातून गोळा करण्यात आलेल्या घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केल्यानंतर खतनिर्मिती केली जाते. जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ चांदूर बाजार नगर परिषदेची मशीन सुरू असून, येथील घनकचरा निर्मूलन नियमानुसार केला जात आहे. कंपोस्ट डेपो ग्रामीण भागात येत असल्याने भारनियमनाचा परिणाम यावर होताना दिसत आहे. यावर उपाय केले जात आहेत. विजय देशमुख, मुख्याधिकारी न. प., चांदूर बाजार

याकडे केले जातेय दुर्लक्ष
जल (प्रदूषण, प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९७४ अंतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये निर्माण होणारे घरगुती सांडपाणी गोळा करून त्यावर योग्य ती प्रक्रिया करून मगच त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पर्यावरण व वने मंत्रालय भारत सरकारमार्फत नागरी घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी) नियम २००० हे पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अंतर्गत आहेत. या नियमाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची योग्य वर्गवारी करीत त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतलेल्या अधिकार पत्राप्रमाणे व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात अाले आहे.