आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- गेल्याआठ दशकांपासून अमरावतीचे वैशिष्ट्य ठरलेल्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या (एचव्हीपीएम) दसरा महोत्सवाची गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या दोन तारखेला तयारीवर अंतिम हात म्हणून रंगीत तालीम होणार आहे.

दसरा मैदानावर दस-याच्या दिवशी सायंकाळी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या दसरा महोत्सवाचे आयोजन केले जाते. सुभाषचंद्र बोस यांच्यापुढे स्व. अंबादासपंत वैद्य यांच्या नेतृत्वातील एचव्हीपीएमच्या पथकाने भारतीय युद्धकला आणि व्यायामपद्धतीचे प्रदर्शन घडवले होते. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.

दसरा महोत्सवात लेझीम, डंबेलस कवायती, भाला ड्रील, रायफल ड्रील, दंडबैठक, नावीन्यपूर्ण एरोबिक्स ड्रील, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, शरीरसौष्ठव, दांडपट्टा प्रात्यक्षिक, मुलींची ढाल तलवारबाजी, कराटे, टॉर्चड्रिल अशा विविध प्रकारांचे सादरीकरण केले जाते. प्रत्येक २०० मुले मुलींचा गट सुमारे ७० वर्षे जुन्या बँड पथकाच्या तालावर कवायती सादर होतील. मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनात प्रा. वसंत हरणे, विकास कोळेश्वर, प्रा. जयंत गोडसे, नाना पाटील, नाना दलाल, विलास दलाल, संतोष इंगोले, मंडळाचे सचिव माधुरी चेंडके, प्रा. संजय तीरथकर, प्रा. संजय हिरोडे, प्रा. आशीष हटेकर हे तज्ज्ञ महोत्सवाची तयारी करीत आहेत.
एकाचवेळी 5000 विद्यार्थी सादर करतील कौशल्य
एकाचवेळी पाच हजार विद्यार्थ्यांचे कौशल्य बघण्याची संधी वर्षातून एकदाच मिळत असल्यामुळे दसरा महोत्सवाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. एवढ्या मोठ्या संख्येत विदर्भात अन्यत्र कुठेही दसऱ्याला असे आयोजन होत नाही. पाच हजार विद्यार्थ्यांचे व्यायाम प्रकार कवायतींच्या आवश्यकतेनुसार 500, 250, 200 अशा संख्येत गट पाडून त्यांच्याकडून नेत्रदीपक कवायती करवून घेतली जात असते.
भारतीयक्रीडा प्रकारांवर भर
दसरामहोत्सवाच्या निमित्ताने काही विलुप्त होत असलेल्या भारतीय क्रीडा प्रकारांची सर्वांना माहिती मिळावी. ते प्रकार नेहमीसाठी जिवंत राहावे, हाच या उत्सवामागील मुख्य उद्देश आहे. या अनमोल ठेव्याचे जतन करण्याच्या उद्देशा दरवर्षी आयोजन होत असते. त्यामुळे विविध भारतीय व्यायामप्रकार आणि खेळांचे सुरेख प्रदर्शन बघण्याची संधी अमरावतीकरांना मिळत असते.