आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाची शिकार नाही, पण मृत्यू हल्ल्यातूनच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पूर्व मेळघाट व्याघ्र परिक्षेत्रातील अंजनगावलगत असलेल्या चिंचखेड जंगल परिसरातील कुंड येथील सव्र्हे क्रमांक 1मध्ये बुधवारी कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळला होता. वाघाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज प्रथमदर्शनी वनविभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला होता. वाघावर हल्ला झाल्याने त्याचा मृत्यू झाला असून, ही शिकार नसल्याच्या निष्कर्षावर दुसर्‍या दिवशीच्या प्राथमिक चौकशीअंती वनविभाग पोहोचला आहे. एका गुराख्यावर वाघाने हल्ला चढवला. गुराख्याने आत्मसंरक्षणासाठी केलेल्या प्रत्युत्तरात हा वाघ गंभीर जखमी होऊन मृत झाल्याची शक्यता वनविभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

कुंड परिसरातून वाहणार्‍या एका नाल्यालगत केवळ अर्धा ते एक फूट खड्डा तयार करून वाघाचा मृतदेह पुरण्यात आला होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी परिसरात पसरली होती. वनविभागाचे वनरक्षक के. व्ही. हीरे आणि वनमजूर शिवा वाघमारे यांनी ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर हा प्रकार बुधवारी समोर आला होता. या वेळी राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या दिशानिर्देशानुसार द्विसदस्यीय पथक नेमून वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाचे विशाल बन्सोड, मुख्य वन्यजीव रक्षकचे डॉ. स्वप्निल सोनोने तसेच दोन पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश होता. या वेळी मृत वाघाची कातडी, हाडे कुजलेल्या अवस्थेत होती.

चार दात आणि नखे मात्र तिथे आढळली नाहीत. मात्र, गुरूवारी उशीरा गावातीलच काही जणांकडून वनविभागाला अठरा नखे व दात मिळाले. कातडी आणि हाडे जागेवरच मिळाल्यामुळे ही शिकार नसल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे. याचवेळी कुंड परिसरात चौकशी केली असता, वनविभागाच्या पथकाला काही माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे वाघाची हत्या झाल्याचे पुढे आले आहे. यामध्ये शिकारीचा प्रकार नाही. केवळ माहिती दिल्यास आपण अडचणीत येऊ, या भीतीनेच त्या शेतकर्‍याने वाघाला पुरले. असे झाले असले तरीही परस्पर वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे, हा प्रकार गुन्हा आहे. त्यामुळेच वनविभागाच्या परतवाडा येथील पथकाने गुरुवारी सकाळी नानाजी भुरा साकोम, प्यारेलाल चैतराम कोगे, मोतीलाल सुकलाल बर्वे, गोपीचंद प्यारेलाल अंजेरिया आणि बाबुलाल चैतराम कोगे या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे.

वाघाची हत्या कशी झाली?
कुंड येथील एक गुराखी 19 सप्टेंबरला गाई व म्हशींना जंगलात घेऊन गेला होता. दरम्यान, दुपारच्या सुमारास गुराख्यावर एका वाघाने हल्ला चढवला. या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्यावर उपचार करण्यात आले. तो बरा झाला; मात्र वाघाच्या दहशतीमुळे कोणीही त्यानंतर जवळपास दहा दिवस त्या परिसरात गेलेच नाहीत. बुधवारी वाघाचा कुजलेला मृतदेह आढळल्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्या गुराख्याची चौकशी केली. त्या वेळी गुराख्याने सांगितले की, 19 सप्टेंबरला वाघाने हल्ला केला. त्या वेळी आत्मसंरक्षणासाठी कुर्‍हाडीने वाघावर हल्ला केला; तसेच सोबत असलेल्या म्हशींनीही वाघाला शिंगे मारली. यामध्ये वाघ जखमी झाला असावा. तसेच दहा दिवसांनंतर गावातीलच एक जण या परिसरात गेला असता, नानाजी साकोम या शेतकर्‍याच्या शेताजवळ वाघ मृतावस्थेत पडून होता. त्याने ही माहिती साकोमला सांगितली. साकोमने अन्य चौघांच्या मदतीने नाल्याजवळ खड्डा तयार करून वाघाला पुरले. मात्र, या वेळी केवळ अर्धा ते एक फूट खोल खड्डा केल्यामुळे वाघाच्या मृतदेहाची दुर्गंधी पसरली. त्यामुळेच हे प्रकरण पुढे आले.