अमरावती- शेतातील विहीर अथवा बोअरवेलकरिता वीज जोडणी करून देणारी सर्मपित वितरण सुविधा (नॉन डीडीएफ - सीसीआरएफ) ही योजना महावितरणने बंद केल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांवर संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंद केलेली ही योजना तत्काळ सुरू करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.
भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी यासंदर्भात महावितरणच्या संचालकांना पत्र पाठवले आहे. जिल्ह्यात दहा हजारांहुन अधिक शेतकर्यांना अद्यापही वीज जोडणी करून मिळाली नाही. त्यातच शेतकर्यांच्या सुविधेकरिता असलेली ही योजनाच बंद केल्याने सिंचनाचा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला असल्याचे तुषार भारतीय यांनी पत्रात नमूद केले आहे.
कृषिपंपांसाठी साहाय्यकारी योजना बंद :
कृषिपंपासाठी अर्ज केल्यानंतर महावितरणकडे वीज जोडणीचे साहित्य उपलब्ध नसल्यास शेतकर्याला स्वत:च्या खर्चाने वीज जोडणीची मुभा होती. त्यानंतर जोडणीकरिता झालेला खर्च शेतकर्याच्या बीलामधून वजा करण्यात येत होता. यामुळे कृषिपंपाकरिता वीज जोडणी मिळण्यास विलंब लागत नव्हता. मात्र, आता ही योजना फक्त कृषी विभागामुळे बंद करण्यात आली आहे. याबाबत यावर्षी 29 जानेवारीला महावितरणने नवे आदेश जारी केलेत. तथापि, अपार्टमेंट, व्यापारी संकुल, मॉल, यांच्याकरिता ही योजना सुरू आहे.