आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासकामांची संथगती; आमदार रावसाहेब शेखावत यांनी घेतला पालिकेत आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील संथगतीने होत असलेल्या विकासकामांबद्दल नाराजी व्यक्त करत आमदार रावसाहेब शेखावत यांनी बुधवारी (दि. 30) अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून होत असलेली विकासकामे तातडीने पूर्ण करण्याबाबत महापालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या.

महाराष्ट्र शासनाकडून महापालिकेला मोठय़ा प्रमाणात अनुदान मिळाले आहे. त्या निधीतून विकासकामे प्रारंभ करण्यात आली, तर काही कामे अद्यापही सुरू झाली नाहीत. विकासकामे का रखडली, याबाबत आमदार शेखावत यांच्याकडून आढावा घेण्यात आला. महापालिकेच्या नियोजित कामांसोबत ही विकासकामेदेखील प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याबाबत आमदारांकडून सूचना करण्यात आली. प्राप्त निधीतील शीर्षनिहाय विकासकामांची माहिती प्रशासनाकडून घेण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, आचारसंहिता आरंभ होण्यापूर्वी कामे सुरू होणे आणि तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.
महापालिकेला प्रथमच अतिवृष्टीतून रस्त्यांकरिता तब्बल 20 कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. त्यातील केवळ दहा कोटी रुपयांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. यासह शिवटेकडी व भीमटेकडीवरील विकासकामांनी गती घेतलेली नाही. परकोट संवर्धन व सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे.
साडेबारा कोटी रुपयांमधून केली जाणार्‍या विकास कामांना ‘ब्रेक’ लागला आहे. आचारसंहिता आरंभ होण्यास काहीच दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असून, त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनादेखील महापालिका अधिकार्‍यांना या प्रसंगी आमदार शेखावत यांच्याकडून देण्यात आल्या. या वेळी आयुक्त अरुण डोंगरे, महापौर विलास इंगोले, पक्षनेते बबलू शेखावत, उपायुक्त विनायक अवघड, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेर्शाम, मनोज भेले, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, विकासकामांशी संबंधित अभियंतेदेखील बैठकीला उपस्थित होते.