आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धामणगावात कायम ‘कोंडी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगावरेल्वे- शहरात अनेक चौकांमध्ये व्यापारी संकुलांमध्ये वाहनतळ नसल्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली अाहे. वाहनचालकांकडून इतस्ततः: वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे ही चिंताजनक बाब बनली आहे.
प्रत्येक चौक हा ‘डेंजर स्पॉट’ बनू लागला आहे.
अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात दररोज कुठे ेना कुठे छोटे-मोठे अपघात घडू लागले आहेत. शहरात पार्किंगची समस्या तशी नवीन नाही. दिवसेंदिवस शहरात वाहनांची संख्या वाढू लागली आहे. मात्र त्याप्रमाणात वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये शिस्त दिसून येत नाही. जे काही वाहनचालक नियम पाळतात, त्यांनाही यामुळे मनस्ताप सहन करावा लागता. अनेकदा तर भरधाव आलेल्या वाहनांमुळे अपघातही घडले आहेत. वाहनचालकांना मार्ग शोधण्यासाठी कसरत करावी लागते. शहरात धोकादायक वाहतुक दिवसेंदिवस वाढतच आहे.
या समस्येवर कुणाचाही वचक राहिला नाही. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी ठिकठिकाणी वाहनतळ शिवाय नगर परिषदेच्या वतीने योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र या मागणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. एकादी मोठी घटना घडली, तरच प्रशासनाला जाग येईल काय, असा प्रश्नही धामणगाववासियांकडून केला जात आहे.
वाहनांचीहोतेय कोंडी
शास्त्रीचौक, टिळक चौक, सिनेमा चौक, गांधी चौक, रेल्वे फाटक, भगतसिंग चौक, कॉटन मार्केट चौक ही वर्दळीची ठिकाणे आहेत, परंतु बेशिस्त वाहतुकीमुळे येथे वाहतुकीची कोंडी होत असते. वाहनचालकांनी थोडा समंजसपणा संयम ठेवला, ती ही कोंडी सुटू शकते.
रेल्वे फाटकावर वाहनचालकांची स्पर्धा
मध्य रेल्वेमुळे शहराचे दोन भाग झाले आहेत. त्यामुळे रेल्वे फाटकावर वाहतुकीची समस्या कायम आहे. रेल्वे फाटक उघडताच आपले वाहन पुढे दामटण्यासाठी वाहनचालकांमध्येच स्पर्धा लागलेली असते. त्यामुळे दररोज येथे एक तरी अपघात घडल्याशिवाय राहत नाही.
नियमांची पायमल्ली
बहुतेक वाहन चालकांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली होतानाचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. काही वाहने फारच वेगाने, तर काही वाहने कासवगतीने येतात. त्यामुळेही वाहतुकीची कोंडी होताना दिसते.
जड वाहनांची वाहतूक
शहरातील काही मुख्य रस्त्यांवरून जड वाहनांच्या वाहतुकीला परवानगी नाही. तरीही या मार्गांवरून दररोज मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत असते. याचा फटका पादचाऱ्यांना बसतो. प्रसंगी अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
महावीर भवनासमोर होणारी वाहनांची कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे.
गांधी चौकाला वाहनांचा असा विळखा बसला आहे.
बातम्या आणखी आहेत...