आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीतील उद्योजकांना मिळणार करात सवलत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावतीतील उद्योजकांना लवकरच स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि मालमत्ता करात सवलत देण्यात येणार आहे. आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांची भेट घेतली असता, त्यांनी यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत शिष्टमंडळाला आश्वासन दिले. महापालिका क्षेत्रामध्ये एलबीटी लागू होण्यापूर्वी एमआयडीसीतील उद्योगांना लागणार्‍या कच्च्या मालावर अर्धा टक्का जकात कराची आकारणी करण्यात येत होती. एलबीटी लागू केल्यानंतरही वाढलेल्या करांमुळे उद्योग अडचणीत आलेत. त्यामुळे एलबीटीचीसुद्धा जकातप्रमाणे अर्धा टक्का या दराने आकारणी करण्यात यावी, अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात आली होती. त्यानुसार आमदार शेखावत यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात महापालिकेच्या आमसभेत ठराव पारित करून तो शासनाकडे पाठवण्यात आला होता.

या अनुषंगाने या प्रस्तावास मान्यता देण्याच्या मागणीसाठी श्रीकांत सिंह यांची भेट घेण्यात आली. या वेळी उद्योजकांच्या मागण्यांवर व्यापक चर्चा करण्यात आली.

सर्व उपकरांसह एक रुपया दहा पैसे दराने मालमत्ता कराची आकारणी करण्यास पदाधिकार्‍यांनी होकार दिल्याने श्रीकांत सिंह यांनी मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांच्याशी संपर्क करून मालमत्ता कराचा प्रश्न महापालिका स्तरावरच सोडवण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले.

एलबीटीसंदर्भातील प्रस्तावास तातडीने मान्यता देऊन पत्र पाठवणार असल्याचे श्रीकांत सिंह म्हणाले. शिष्टमंडळामध्ये आमदार शेखावत यांच्यासह अमरावती विभागीय इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र वर्मा, उपाध्यक्ष दिलीप अग्रवाल, सचिव सुरेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. सिंह यांच्या आश्वासनाने उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्यात.