आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेला जाळणा-या आरोपीची जन्मठेप कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सतरावर्षांपूर्वी एका विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने एका आरोपीला ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा हायकोर्टाच्या आदेशान्वये बयाणातील तपासणीअंती विवाहितेचे मृत्युपूर्व बयाण ग्राह्य धरून शुक्रवारी कायम ठेवण्यात आली. हा निर्णय जिल्हा न्यायाधीश (क्रमांक २) एस. एस. दास यांच्या न्यायालयाने शुक्रवारी दिला .
युवराज टेकराम ढोके असे शिक्षा झालेल्या आरोपीचे तर रामरती गणेशसिंग ठाकूर (रा. वरुड)असे मृतक महिलेचे नाव आहे. रामरती ठाकूर या त्यांच्या दोन मुलांसह वरुडलाच स्वतंत्र राहत होत्या. त्यांच्याकडे प्रकाश रामटेके हा गुराखी म्हणून कार्यरत होता. त्याचवेळी रामरती यांच्या घराजवळ युवराज ढोके राहत होता. त्याची पत्नी घरून निघून गेली होती. मात्र, ती कधी कधी रामरतीकडे यायची. त्यामुळे माझी पत्नी कुठे आहे, असे युवराजने रामरतीला िवचारले असता मला माहिती नाही, असे रामरतीने सांगितले.
२६ जुलै १९९७ ला युवराज हा रामरती यांच्या घरी रॉकेल घेऊन गेला. पत्नीबाबत त्याने पुन्हा विचारणा केली; मात्र रामरतीने मला माहीत नाही, असेच सांगितले. यामुळे युवराज संतापला त्याने रामरतीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. त्यानंतर तो पसार झाला. काही वेळानंतर गुराखी प्रकाश रामटेके हा रामरतीच्या घरी पोहोचला. त्यानेच रामरतीला विझवले. या वेळी प्रकाशचेही हात भाजले. या वेळी गंभीर अवस्थेत रामरती यांनी मृत्यूपुर्व जबाब दिला. युवराजनेच पेटवून दिल्याचे त्यांनी जबाबात सांगितले; तसेच रुग्णालयात जातेवेळी रामरतीने प्रकाशलासुद्धा सांगितले होते की, मला युवराजने पेटवून दिले. तसे प्रकाशने वरुड पोलिसांनाही सांगितले होते. दरम्यान, २७ जुलैला रामरती यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणचा तपास पूर्ण करून वरुड पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयाने रामरती यांचा मृत्यूपूर्व जबाब ग्राह्य धरून युवराज ढोकेला जन्मठेपेची शिक्षा काही वर्षांपूर्वीच सुनावली होती. मात्र युवराजने हाय कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान, प्रकाशने िदलेल्या साक्षीवरून प्रकरणाला वेगळीच कलाटनी मिळाली. याप्रकरणावर निर्णय देण्यापुर्वी नागपूर उच्चन्यायालयाने सदर प्रकरणातील प्रकाशचा जबाब आणि रामरती यांचे मृत्यूपुर्व जबाब यातील तपासणी करून निर्णय पुन्हा द्यावा, असे आदेश जिल्हा न्यायालयाला दिले होते. त्यामुळेच येथील जिल्हा न्यायाधिश (क्रमांक २) एस. एस. दास यांनी ऑक्टोंबरला या प्रकरणाची सुनावनी घेतली. जिल्हा न्यायालयातही प्रकाशने भांडण झाल्यामुळेच त्यांनी पेटवून घेतले असे सांगितले मात्र न्यायालयाने रामरती यांचा मृत्यूपुर्व जबाबच ग्राह्य धरून ढोके याची जन्मठेप कायम ठेवली.या प्रकरणात सरकारी वकिल अॅड. उदय देशमुख यांनी युक्तीवाद केला.