आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा पुरवठा विभागाच्या कारभारावर ओढले ताशेरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - काही महिन्यांपासून जिल्हा पुरवठा विभागाचा कारभार ढेपाळला आहे. वारंवार दिलेल्या सुचनांचे पालन होत नसल्याचे सांगून उपायुक्त माधव चिमाजी यांनी पुरवठा विभागाच्या कारभारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे यवतमाळ तालुक्यातील साखर घोटाळ्याचा उल्लेख करताना त्यांनी पुरवठा अधिका-याला चांगलेच धारेवर धरले. गुरुवार, 3 जुलै रोजी पुरवठा विभागाचे उपायुक्त माधव चिमाजी यांनी यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली.
त्यावेळी साखर घोटाळ्याचा अंतिम अहवाल त्यांच्याकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे अहवाल पाठवण्यातील दिरंगाईबाबत त्यांनी चांगलीच कानउघाडणी केल्याची चर्चा पुरवठा विभागात सुरू आहे.

यवतमाळ जिल्हा पुरवठा विभागाच्या गचाळ कारभारांचे धिंडवडे काढणा-या घटना काही महिन्यात घडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ तालुक्यातील साखर घोटाळा, रॉकेल वाटपात अनियमितता, झरीजामणी येथील धान्य घोटाळ्यातील संशयास्पद कारवाई तसेच महागाव येथील साखर, धान्य घोटाळा, आर्णी तालुक्यातील रॉकेल जप्ती प्रकरण आदी प्रकरणात पुरवठा विभागाने कारवाई केली. मात्र, पुरवठा विभागाच्या कारवाईमध्ये सुसूत्रता नसल्याचे समोर आले होते. या प्रकरणी भोसा येथील राजू शेख, गजानन भडके, अनंत नागरगोझे आदींनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागाकडून तक्रारींची दखल घेण्यात आलीच नाही.
दरम्यान, त्यांनी पुरवठा विभागाचे उपायुक्त माधव चिमाजी यांच्याकडे तक्रारी केल्या. यावरून त्यांनी गुरुवारी जिल्हा पुरवठा विभागाला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिका-यांनी त्यांची बाजू मांडली. विशेष म्हणजे 2010 मधील झालेल्या साखर घोटाळ्याच्या वारंवार तक्रारी करूनही अहवालातील दिरंगाई त्यांना भोवली. यावर उपायुक्तांनी थेट तहसीलदारांना बोलावून अहवाल मागवला. या अहवालात सध्या बाराशे क्विंटल साखर घोटाळा झाल्याचे निदर्शनास आणून दिले. यापूर्वीच्याअहवालात जवळपास चार हजार क्विंटल साखर घोटाळा झाल्याचे दाखवण्यात आले होते. यावरून कामात सुसूत्रता नसल्याचे सांगितले. रेशन दुकानांच्या परवान्यासाठी जाहिरनामे काढण्यात आले. वाटप करताना आर्थिक उलाढालीबाबत चिमाजी यांनी विचारणा केली.

साखर घोटाळ्यात तफावत
यवतमाळ तालुक्यातील साखर घोटाळ्याचा अहवाल चौथ्यांदा बनवण्यात आला आहे. प्रत्येकवेळी अहवाल कुठल्या न कुठल्या कारणाने परत पाठवण्यात येत आहे. पुरवठ्याच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली. सध्या पाठवण्यात आलेला बाराशे क्विंटल साखर घोटाळ्याच्या अहवालात तफावत आहे.’’ राजू शेख, सदस्य, अन्न धान्य दक्षता समिती, यवतमाळ.

सहा विक्रेत्यांचे परवाने रद्द
घाऊक आणि अर्ध घाऊक केरोसीन विक्रीचा परवाना वेगवेगळ्या लोकांना देणे आवश्यक आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील सहा लोकांकडे रॉकेलचे दोन्ही परवाने देण्यात आले आहे. हे परवाने त्वरित निलंबित करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे रॉकेलचा परवाना रद्द केल्यानंतर 30 किलोमिटर अंतरावरील विक्रेत्यालाच हा परवाना चालवण्यासाठी द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

उपायुक्तांची रूटीन भेट होती
पुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येकवेळी अधिकारी जिल्ह्यात प्रत्यक्ष भेटी देतात. चिमाजी यांची ही भेट रूटीन होती. त्यांनी पुरवठा विभागाचा आढावा घेतला. झरीजामणी येथील अकरा रेशनच्या दुकानाबाबतही विचारणा केली. यवतमाळ तालुक्यातील साखर घोटाळ्याचा सुक्ष्म अहवाल मागवून घेतला.’’ राजेंद्र निफाडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ.