आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायन्सकोरवर उभारणार जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी गित्ते यांनी दिली ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील सायन्सकोर मैदानावर लवकरच जिल्हा क्रीडा संकुल उभारले जाणार असून हा जिल्हाधिकाऱ्यांच्या खेळांसदर्भातील व्हीजन ट्वेंटी-२० चाच एक भाग आहे. खेळाडूंना सायन्सकोर मैदानावर हक्काने खेळता यावे, अशी सोय असावी म्हणून दै. दिव्य मराठीने मागील एका वर्षापासून मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेला अखेर यश आले असून, सायंन्सकोर मैदानावर लवकरच क्रीडा संकुल साकारण्याची आशा बळावली आहे.

गाव तेथे क्रीडांगण, तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारणीसोबतच अमरावतीत जिल्हा क्रीडा संकुल उभारणार अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी एचव्हीपीएम येथे आयोजित विभागीय जिम्नॅस्टिक्स शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलताना दिली. पालकमंत्र्यांनीही या जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. सायन्सकोर मैदानानवर गेल्या अनेक दशकांपासून फुटबॉल हा खेळ खेळला जात आहे. मात्र त्यांना खेळण्यासाठी हे अधिकृत मैदान नाही.
सध्या या मैदानाचा ताबा हा जिल्हा परिषदेकडे असल्यामुळे ते सभा, संमेलनं, प्रदर्शनी, सर्कस, धार्मिक आयोजनांसोबतच इतर मोठया कार्यक्रमांसाठी दिले जाते. सायन्सकोवर फुटबॉल हॉकी मैदानासोबतच जलतरण केंद्राची योजना आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठवण्याचे निर्देश दिल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
तालुकास्तरावर नियोजन, सुविधांची होईल पुर्तता
मुंबई, नाशिक आणि पुणे हे जिल्हे राज्यात खेळात अग्रणी आहे. तेथे विभागीय क्रीडा संकुलासोबतच जिल्हा क्रीडा संकुलही आहेत. अमरावती ही विदर्भातील क्रीडानगरी असल्यामुळे येथेही एका जिल्हा क्रीडा संकुलाची आवश्यकता आहे. सायन्सकोरवर जर ते उभारण्यात आले तर विभागीय क्रीडा संकुलात ज्या सोयी नाहीत, त्याची पूर्तता येथे होईल.

तालुकास्तरावर नियोजन
व्हीजन ट्वेंटी-२०च्या आराखड्यानुसार प्रत्येक तालुक्यात क्रीडांगणांची दुरुस्ती, सुरक्षा आणि अतिक्रमण रोखण्याचे काम सर्वप्रथम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती निधी पुरवणार असून सर्वप्रथम सहा तालुक्यांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी असलेले क्रीडांगण उभारले जाईल. तालुकानिहाय ५५ ते १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...