आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी फतवे नकोत, आम्हीच करू आमचे रक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-महिलांवरील वाढत्या अत्याचाराला महिलाच जबाबदार आहेत.’ महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी महिलांबाबत केलेल्या या आक्षेपार्ह विधानावर अमरावतीतील विविध क्षेत्रांतील महिलांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
महिलांवरील वाढत्या अत्याचाराला त्यांचे कपडे, देहबोली, वेशभूषा, केशभूषा यांच्यासह त्या स्वत: जबाबदार आहेत, या डॉ. मिरगे यांच्या वक्तव्यावर विविध क्षेत्रांतील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिला या स्वत:चे रक्षण करण्यास सक्षम असून, महिला आयोगाच्या सदस्यपदावरील एका महिलेनेच अशा प्रकारचे वक्तव्य करणे संताप आणणारे असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले आहे. आधुनिकतेची कास धरलेल्या भारतासारख्या प्रगतिशील देशात आजही महिलांबाबत बुरसटलेले विचार मन विषन्न करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. मिरगे यांच्या वक्तव्यामुळे महिलांच्या हक्कांसाठी लढणार्‍यांना धक्का बसला. महिला आयोगाच्या सदस्यानेच असे वक्तव्य केल्याने आता कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न त्यांनी केला आहे.
डॉ. मिरगे यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. त्या एकप्रकारे महिलांचे अध:पतनच करू इच्छित आहेत. एक महिलाच स्त्रीजातीचे धिंडवडे काढतेय, ही लज्जास्पद बाब आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. सुरेखा लुंगारे, शहर जिल्हा सचिव, भाजप
आधी समाजात परिवर्तनासाठी प्रयत्न करा
मुळातच डॉ. आशा मिरगे यांचे विधान चुकीचे व निंदनीय आहे. प्रथम मानवजातीचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. तेव्हाच अशा घटनांना आळा बसेल. खरे तर एका जबाबदार पदावर कार्यरत स्त्रीने असे वक्तव्य करण्याऐवजी या परिवर्तनासाठी पहिल्यांदा प्रयत्न करायला हवेत. माधुरी चेंडके, सचिव, र्शी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ.
तालिबानी फतवा नको
एका जबाबदार पदावर असलेली ही स्त्री महिलांचे प्रश्न सोडवूच शकत नाही. पुरुषसत्ताक व्यवस्थाच स्त्रियांवरील अन्याय, अत्याचाराला कारणीभूत आहे. ‘सातच्या आत घरात’ हा तालिबानी फतवा काढायला निघालेल्या डॉ. मिरगे यांचा मी निषेध नोंदवते. आमची सुरक्षा डॉ. मिरगे करूच शकत नाहीत. प्रा. डॉ. निशा शेंडे, संस्थापक अध्यक्ष, महिला प्राध्यापक परिषद.