आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपातील सहभाग येणार ‘अस्थायीं’च्या अंगलट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्ह्यासह राज्यात तीन दिवसांपासून सुरू असलेले वैद्यकीय अधिका-यांचे कामबंद आंदोलन गुरुवारी चिघळले. आंदोलनात सहभागी सर्व अस्थायी वैद्यकीय अधिका-यांना 24 तासात रुजू व्हा अन्यथा कामावरून कमी करा, अशा आरोग्य संचालक आणि उपसंचालकांच्या लेखी सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेस गुरुवारी प्राप्त झाल्यात, तर दुसरीकडे वर्ग एक आरोग्य अधिका-यांची जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेने कामबंद आंदोलनात उडी घेण्याचे संकेत दिले.

मंत्रालयीन पातळीवर मागण्या पूर्ण करण्यास सचिव पातळीवर अटकाव होत असल्याने आंदोलन चिघळणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची आणि रुग्णांची नाडी शालेय आरोग्य पथक आणि कंत्राटी डॉक्टरांच्या हाती सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि संस्था, संघटनांकडून रुग्णालयीन समस्यांविषयक तक्रारी सुरू झाल्या आहेत. आरोग्य यंत्रणेंतर्गत असलेल्या सर्व विभाग आणि संघटनांमध्ये ताळमेळ नसल्याने याचा फटका थेट रुग्णांना बसतो आहे. शासन आणि संघटना आपापल्या भूमिकांवर आणि घेतलेल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगांचा सामना मात्र जिल्हा प्रशासनाला करावा लागतो आहे.

दोन वेळ फॉलोअप बाकी रेफर टु : जिल्ह्यात शालेय आरोग्य पथकांचे 63 जणांमार्फत आरोग्य केंद्रातील रुग्णांची नाडी तपासली जात आहे. रुग्ण गंभीर असल्यास त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना सर्वाना देण्यात आल्या आहेत.

राजीनामे पोहोचणार शासनाच्या दारात
यवतमाळत जिल्ह्यातील 154 वैद्यकीय अधिका-यांनी आपले राजीनामे दिले. संघटनेच्या पदाधिकारी डॉक्टरच्या हस्ते मंगळवारी मुंबईला आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड आणि सरचिटणीस डॉ. प्रमोद रक्षमवार यांच्याकडे राजीनामे सुपूर्द करण्यात आलेत. राज्यातून दहा हजारांवर राजीनामे प्राप्त झाल्यावर 4 जुलै रोजी सर्व राजीनामे सामूहिक रीतीने मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

मंत्रालयीन पातळीवर खलबते
मॅग्मोतर्फे मंत्रालयीन पातळीवर चर्चा, पाठपुरावा सुरू आहे. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, सचिव सुजाता सौलक आणि वरिष्ठ पातळीवरील यंत्रणेकडून संघटनेने आंदोलन मागे घेण्याकरिता दबाव वाढत आहे. संघटनेच्या सर्व मागण्या मंजूर असून, कागदावर लेखी आश्वासन देण्यास तयारी आहे. मात्र, आजपर्यंतचा अनुभव बघता, अशी अनेक आश्वासने दिली जातात. मात्र, कॅबिनेट निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका मॅग्मोने घेतल्यामुळे पेच वाढला आहे.

सामूहिक होळी करणार...
- स्थानिक, विभागीय अथवा राज्य पातळीवरून वैद्यकीय अधिका-यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाल्यास त्याच्यासह शासनाचा तीव्र निषेध करणार. आता स्थायी, अस्थायी असा भेद नसून कुणीच मागे हटणार नाही. निलंबनाचे पत्र दिले गेल्यास त्याची सार्वजनिकरीत्या होळी करणार.’’
डॉ. मोहन खडतकर, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, यवतमाळ