आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांचा संयम सुटला; डॉक्टरांचा संप मिटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- डॉक्टरांच्या संपामुळे ग्रामीण रुग्णालयात येणार्‍या रुग्णांचे प्रचंड हाल झाले. संप कधी मागे घेण्यात येईल, याची माहिती मिळत नसल्यामुळे व आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपचारासाठी या रुग्णांना दररोज ग्रामीण रुग्णालयात पायपीट करावी लागली. दरम्यान, दुपारनंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आल्यामुळे उद्यापासून आरोग्य सुविधा सुरळीत होणार आहे.
पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे आजारी रुग्णांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारे नव्हते. अशा रुग्णांचे प्रचंड हाल झाले. संपामुळे काही ग्रामीण रुग्णालयेही ओस पडली होती. परतवाडा येथील रुग्णालयात दररोज सरासरी दीडशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी येत असतात. परंतु, संपामुळे येथील उपजिल्हा रुग्णालय ओस पडले होते. अशीच स्थिती मोर्शी, वरुड, अंजनगावसुर्जी, चांदूरबाजार, दर्यापूर येथील रुग्णालयांत दिसून आली. उपचारासाठी या रुग्णांना ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची वाट पाहावी लागली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना उपचाराविना परतावे लागले.
डॉक्टरांच्या संपाचा ग्रामीण व शहरी भागांनाही फटका
मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाचा सर्वाधिक फटका सामान्य व गोरगरीब नागरिकांना बसला. ग्रामीण भागात पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली असली, तरी संपामुळे रुग्णालये ओस पडली. त्या तुलनेत अमरावती शहरात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालय व स्त्री रुग्णालयातील रुग्णांना सर्वाधिक फटका बसला. दुपारनंतर डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आल्यामुळे मंगळवारपासून (दि. 8) आरोग्य सेवा सुरळीत होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.