आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐ मेरे वतन के लोगों

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सगळ्यांना सोईची वेळ म्हणून सोसायटीचे झेंडावंदन सकाळी सातच्या ऐवजी दहा वाजता आयोजित केले जाते. मात्र, त्यालाही मोजकी चार-पाच डोकी हजर असतात आणि बाकीची डोकी खाली काय सुरू आहे म्हणून आपलं डोकं खाजवत असतात. आज आपल्याजवळ हॉटेल, सिनेमा, नाटक, खरेदी, किटी पार्टी या सगळ्यांसाठी वेळ असतो, मात्र आपल्या देशाच्या ध्वजारोहणासाठी नाही

ना इज्जत दे, ना अजमत दे
ना सुरत दे, ना सिरत दे
मेरे वतन के वासते या रब
मुझे मरने की सिर्फ हिंमत दे


असं खरोखर आयुष्य जगून भगतसिंग, सुखदेव व राजगुरू ही कोवळी मुलं फासावर झुलली. हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी एक रक्तरंजित क्रांती बघावी लागली. अत्यंत दुर्दैवी पद्धतीने कितीतरी माया-बहिणींच्या कपाळावरचे कुंकू कायमचे पुसले गेले. कितीतरी निष्पाप मुले मायेला पोरकी झाली. देशाच्या स्वातंत्र्यापुढे वैयक्तिक दु:ख कुणी कुरवाळत बसले नाही. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, तात्यासाहेब सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, स्वामी विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, रवींद्रनाथ टागोर असे कितीतरी अनमोल हिरे आपल्या देशाला या काळात लाभले.

‘ऐ मेरे वतन के लोगों
जरा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए है उनकी
जरा याद करो कुर्बानी’


हे गाणं ऐकलं, की अजूनही अंगावर काटा उभा राहतो. लतादिदींचा आवाज काळजापर्यंत पोहोचतो, ते डोळ्यांवर पाणी ठेवूनच. कितीतरी वेळ आपण भूतकाळात हरवून जातो. तरी खूपदा वाटतं, जो उत्साह, जाज्‍जवल्य प्रेम, जो अभिमान आपल्या प्रत्येकाला असावा, तो दिवसेंदिवस कुठेतरी कमी होतो आहे.

गावागावांत, शहराशहरांत 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे केले जातात. रांगोळी काढली जाते. तोरणं लावली जातात. मात्र, या सणांमध्ये सामील होण्याचा उत्साह हा खूपच रोडावलेला असतो. वर्तमान स्थितीत प्रत्येक घरातील स्त्रीने पुढाकार घेऊन आई म्हणून आपल्याला पुढची पिढी कशी हवी आहे, याचा विचार करायलाच हवा.

मुलांशी कितीतरी शौर्यगाथांबद्दल बोलता येतं. अगदी कारगीलच्या युद्धात कोवळ्या वयात शहीद झालेल्या कॅप्टन सौरभ कलीया, विक्रम बत्रा, मनोजकुमार पांडे यांसारख्या क्रांतिकारी युवांबद्दल वा मुंबईला अतिरेक्यांपासून वाचवण्यासाठी प्राणपणाने लढणार्‍या हेमंत करकरे, अशोक कामत, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे यांसारख्या पोलिस जवानांबद्दल. रामायण, महाभारतापासून ते आजच्या क्रांतिकारी युवा पिढीपर्यंत अनेक थोरामोठय़ांची चरित्रे आपल्याला जपताही येतील व जगवताही येतील. लुंगी डान्ससारखी घाणेरडी गाणी ऐकत फेसबूक, ट्विटर, व्हॉटस अपवर आपला वेळ घालवायचा, की सळसळत्या क्रांतीचा चिरतरुण इतिहास ऐकत आजच्या पिढीला आदर्श द्यायचा, हे आपणच ठरवायचे! एका अज्ञात कवीच्या ओळी

आँधी से न तुफाँ से
न दुश्मन से डरेंगे
ऐ देश तेरे वासते
हम कट भी मरेंगे
हम अपना लहू देकर
बचायेंगी तेरी जान
इस देश में, इस देश के
लोगों का रहे मान
आझाद थे, आझाद है
आझा रहेंगे
ऐ देश तेरे वासते
हम कट भी मरेंगे

या क्रांतिकारी वीरांना मन:पूर्वक अभिवादन! तुमच्यामुळे आम्ही ताठ मानेने जगतोय, हे कसे विसरायचे!