आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसीपीपीआर आयोगावर डॉ. तिडके नामित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संतगाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके यांना आयसीपीपीआर (इंटरनॅशनल कमिशन फॉर प्लॅन्ट- पॉलिनेटर रिलेशनशिप) या आंतरराष्ट्रीय आयोगावर नामित केले आहे. प्र-कुलगुरूंचा परागीकरण हा संशोधन विषय राहिला असून, या क्षेत्रात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनाची दखल इस्राइल येथील हायफा विद्यापीठाचे प्रो. अमॉट्स डाफनी यांनी घेऊन त्यांच्या नावाची शिफारस आंतरराष्ट्रीय आयोगाकडे केली होती. त्यांच्या शिफारशीनुसार प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके यांना आंतरराष्ट्रीय आयोगाने सदस्यत्व बहाल केले.

परागीकरण करणाऱ्या विविध घटकांचे सूक्ष्म संशोधन करून त्यावर त्यांचे संशोधनात्मक अनेक शोधनिबंध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पावर पोस्ट डॉक फेलो म्हणूनसुद्धा काम केले आहे. त्यांच्या सदस्यत्वाबरोबरच या विभागातून पाच संशोधकांना नामित करण्याचे अधिकार त्यांना प्रदान केले आहे. १९५० मध्ये स्टॉकहोल्म येथे आयोजित बॉटनीकल काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी या आंतरराष्ट्रीय आयोगाची स्थापना केली आहे. त्या वेळी त्याचे नाव इंटरनॅशनल कमिशन फॉर प्लॅन्ट-बी बॉटनी (आयसीबीएस) असे ठेवले होते. १९८५ मध्ये हे नाव इंटरनॅशनल कमिशन फॉर प्लॅन्ट- बी रिलेशनशिप (आयसीपीबीआर) असे केले आणि २०११ मध्ये त्यामध्ये पुन्हा सुधारणा करून इंटरनॅशनल कमिशन फॉर प्लॅन्ट- पोलिनेटर रिलेशनशिप (आयसीपीपीआर) असे केले.
उत्कृष्ट संशोधनाकरिता यापूर्वी प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. आंतरराष्ट्रीय आयोगावर प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके यांची सदस्य म्हणून नियुक्ती होणे ही विद्यापीठासाठी अभिमानाची बाब असून, विद्यापीठाच्या गौरवात भर टाकणारी आहे. त्यांना मिळालेल्या बहुमानाबद्दल कुलगुरू डॉ. मोहन खेडकर, कुलसचिव डॉ. अशोक चव्हाण, विद्यापीठाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी विद्यार्थ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...