आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबीर, गुलालात न्हाले शहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- रासायनिक रंगांना उत्तम पर्याय म्हणून मागील काही वर्षांपासून इको-फ्रेंडली रंगोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यासाठी शासनाचा वनीकरण विभाग, शाळा-महाविद्यालये आणि विविध सामाजिक संघटनांचा रेटा यांचे बहुमोल योगदान आहे. यंदाच्या धूळवडीला बहुतांश अमरावतीकरांनी सुगंधित नैसर्गिक रंगांचा वापर केला. शिवाय, पाण्याचा अपव्ययही होणार नाही, याची खबरदारीही नागरिकांनी काटेकोरपणे घेतली.
कुठे डीजेची धूम, कुठे ढोल-ताशांचा गजर, तर कुठे होम थिएटरवरच ताल धरत अनेकांनी थिरकण्याचा मनमुराद आनंद लुटला. यादरम्यान सहभागी होणार्‍या प्रत्येकाला रंगवण्यात येत होते. ‘रंग बरसे भिगे चुनरवाली.’, ‘डू मी अ फेव्हर लेट्स प्ले होली.’, ‘आज गोकुळात रंग..’ अशी विविध लोकप्रिय गीते चौकाचौकांत ऐकू येत होती.
अनेकांनी केली इको-फ्रेंडली होळी
यावर्षी रंगपंचमीला नैसर्गिक रंगांचा वापर अधिक प्रमाणात केल्याचे चित्र शहरभर होते. गुलाल, हळद, कुंकू, पळसाची फुले तसेच पिठात हळद-कुंकू मिसळून अनेकांनी इको-फ्रेन्डली धूळवड साजरी करत नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळली. ‘एक नगर, एक होळी’ आणि ‘एक गाव, एक होळी’ साजरी करीत नागरिकांनी जणू इको-फ्रेंडली धूळवडीचा आनंद द्विगुणित केला.
आकर्षक मुखवटे व गॉगलचा वापर
स्प्रे, फोम स्प्रे, विविध रंग, पिचकार्‍यांचा वापर करीत बच्च्े कंपनीने धूळवड केली. फॅन्सी गॉगल, अँंग्री बर्ड, छोटा भीम, डोरेमॉन व विविध काटरूनच्या आकारातील कलर टँक, कलर गनचा वापर मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळाला. टोप्या, काटरून, प्राण्यांचे मुखवटे, ‘दबंग’ गॉगल, भोंगे यांचाही मनसोक्त वापर करीत तरुणाईने रंगोत्सवात खरी रंगत आणली.
सुगंधित नैसर्गिक रंगास मागणी
गुलालाची मागणी वाढत आहे. बहुतांश लोकांनी सुगंधित नैसर्गिक रंगाने धूळवड केली. विविध 13 प्रकारांच्या रंगांची उधळण करीत नागरिकांनी रंगपंचमीचा सण साजरा केला. यंदा जवळपास सात टन गुलाल विकला गेला. रासायनिक रंग व गुलालाचा व्यवसाय लाखोंच्या घरात आहे. वसीम अहमद जयपूरवाला, विक्रेता.
शहरातील आबालवृद्धांनी एकमेकांना मनसोक्त रंगवून रंगोत्सवात अधिक सौहार्दाचे रंग भरले. रासायनिक रंगांमुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन अनेकांनी यावर्षी गुलालाचा वापर केला. त्यामुळे यंदा विक्रमी सात टन गुलालाची उधळण झाली. सकाळपासूनच तरुणाई एकमेकांना रंगवण्यासाठी घराबाहेर पडली होती. यंदाच्या रंगोत्सवामध्ये पाण्याची नासाडी होणार नाही, याबाबत प्रत्येक वॉर्डा-वॉर्डामध्ये नागरिक जागरूक होते.