आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eknath Khadse News In Marathi, BJP, Amravati, Divya Marathi

मृतकांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख द्या,एकनाथ खडसे यांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राज्यातील गारपीटग्रस्त भागात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी अमरावतीत केली. ते वैयक्तिक कामानिमित्त येथे आले होते. शहर भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाचे प्रदेश प्रवक्ता किरण पातूरकर, शहर सरचिटणीस तुषार भारतीय, जिल्हा सरचिटणीस प्रा. दिनेश सूर्यवंशी या वेळी हजर होते.
राज्य सरकार गारपीटग्रस्त शेतकर्‍यांबाबत नेहमीच उदासीन आहे. सरकारला शेतकर्‍यांप्रति तळमळ नाही. अकाली पाऊस आणि गारपिटीने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. दुधाळ जनावरे मृत्युमुखी पडलीत, शेतकर्‍यांचे आर्थिक कमाईचे साधन हिरावले गेले. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रतिपशू 25 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी खडसे यांनी केली. अस्मानी संकटामुळे राज्यातील शेतकरी कर्जफेड करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना पीक कर्जमाफी, वीज देयक माफी, तर पाल्यांना शिक्षण शुल्क माफी देऊन पुढील हंगामात शेती कसण्यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खडसे यांनी केली.

आचारसंहितेची अडचण नाही
शेतकर्‍यांवर कोसळलेले अस्मानी संकट ही नैसर्गिक आपत्ती आहे. राज्य सरकारने वेळीच मोबदला द्यावा. सरकारची शेतकर्‍यांप्रति मानसिकता वेळीच जनतेच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकारचा हा आडमुठेपणा आम्ही प्रचाराचा मुद्दा करणार नाही, असे खडसे यांनी स्पष्ट केले. सरकारने मदत केली नाही, तर नाइलाजाने शेतकर्‍यांची बाजू घेत जनजागृती गरजेची आहे, असेही ते म्हणाले.


प्रचाराचा मुद्दा
नुकसानभरपाई देण्यासाठी आचारसंहितेची अडचण नाही. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांशी मी बोललो. त्यांच्या म्हणण्यानुसार, शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला प्रस्ताव दिल्यास मंजूर केला जाईल. मात्र, मुळात प्रस्ताव येणे गरजेचे आहे, असे मत आयोगाने व्यक्त केल्याचे खडसे यांनी सांगितले.