आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक कामांना वेग; इव्हीएमची चाचपणी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कामांना वेग आला आहे. पहिल्या टप्प्यात मतदान यंत्रांची (इव्हीएम) तपासणी सुरू झाली आहे. या अभियानांतर्गत पाच हजार बॅलेट युनिट व चार हजार कंट्रोल पॅनल अशा नऊ हजार यंत्रांची तपासणी केली जाणार आहे.

इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमीटेड (इसीआयएल) या हैद्राबाद स्थित कंपनीचे तीन तंत्रज्ञ या कामासाठी अमरावतीत दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बॅडमिंटन हॉलमध्ये अत्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदान यंत्र तपासणीचे काम सुरू आहे. विशेष असे, की संबंधित प्रक्रिया अत्यंत पारदर्शी असून, त्यामध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 16) दुपारी तपासणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. याप्रसंगी युवक काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते, तर दुसर्‍या दिवशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव उमेश बनसोड यांनी हजेरी लावली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निरीक्षणाखाली यंत्रांची तपासणी सुरू असून, या तपासणीच्या कामासाठी सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी लागणार आहे. तपासणीदरम्यान इव्हीएमची अचूकता योग्य आहे की नाही, हे पडताळून पाहिले जात आहे. जे बटन दाबले, त्याच्या समोरचाच दिवा लागतो की नाही, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे सर्कीट बरोबर आहे की नाही, प्रत्यक्ष मतदान करताना वापरल्या जाणार्‍या बॅलेट युनिटचे बटन योग्यप्रकारे कार्यरत आहेत की नाही, याचीही चाचपणी या अभियानात केली जात आहे.

जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र धुरजड, त्याच विभागाचे तहसीलदार नागपाल चौहान, लिपिक सतीश पेशने आणि त्यांचे सहकारी या कामात व्यग्र आहेत. तपासणीदरम्यान सदोष आढळणार्‍या यंत्रांना इव्हीएम तयार करणार्‍या हैद्राबाद येथील इसीआयएलच्याच कार्यालयात दुरुस्तीसाठी पाठवले जाणार आहे. अभियानातील प्रत्येक बाब निवडणुकीशी संबंधित असल्याने संपूर्ण हॉलवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर आहे. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सशस्त्र पोलिसांचा खडा पहाराही त्या ठिकाणी तैनात आहे.


निवडणूक प्रक्रियेतील एफएलसी पहिला टप्पा

मतदान यंत्रांची सुरू असलेली तपासणी हा निवडणूक प्रक्रियेतील प्रशासकीय कामकाजाचा पहिला टप्पा आहे. त्याला कायदेशीर भाषेत फस्र्ट लेव्हल चेकिंग (एफएलसी) असे म्हणतात. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाआधी यंत्रांची देवाण-घेवाण करतानाही इव्हीएमची तपासणी केली जाते. तत्पूर्वी प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमक्षही यंत्राची पडताळणी केली जाते. यासंबंधी प्रशिक्षणही दिले जाते.