अमरावती - विचार मंचने आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असून, माजी आमदार सुलभा खोडके बडनेर्याच्या उमेदवार असतील, असे संकेत मिळाले आहेत. मंचचा पहिला जिल्हाव्यापी मेळावा रविवारी दुपारी सांस्कृतिक भवनात पार पडला.
सुलभा खोडके यांच्यामुळे बडनेरात, तर संजय खोडकेंमुळे अमरावतीत विचार मंचला मोठे पाठबळ आहे. शिवाय सहकार क्षेत्रातील उपस्थिती व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भागीदारीमुळे जिल्ह्यातही मोठी फळी प्राप्त झाली आहे. म्हणूनच केवळ अमरावती, बडनेरा विधानसभा मतदारसंघांचा विचार न करता जिल्ह्याचा विचार करावा, अशी मतेही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. गुढी पाडव्याला मंचची स्थापना झाली होती.
विविध सेलची स्थापना
विचार मंचचे विविध सेल व पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. यामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रशांत डवरे, शहराध्यक्ष प्रा. संजय आसोले, कार्याध्यक्ष मनोज केवले, बडनेरा शहराध्यक्ष प्रकाश गिडवानी, कार्याध्यक्ष डॉ. राजेश शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष रश्मी नावंदर, कार्याध्यक्ष योगिता सांगोले, महिला शहराध्यक्ष रूपाली ढोरे, कार्याध्यक्ष विजया बांबल, युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत धर्माळे आदींचा समावेश आहे.
प्रमुख समितीचे स्वरूप
विविध सेलवर नियंत्रणासाठी मंचची एक कार्यसमिती नेमण्यात आली. यामध्ये संस्थापक-अध्यक्ष सुलभा खोडके, सचिव रामदास इमले, सहसचिव सत्यप्रकाश गुप्ता, अनिल प्रांजळे, कोषाध्यक्ष पप्पू खत्री, सहकोषाध्यक्ष हारुणभाई सुपारीवाला व प्रवक्ता पॅनेलचे सदस्य अॅड. किशोर देशमुख, अविनाश मार्डीकर, चेतन पवार, मिलिंद बांबल, लकी नंदा, प्रमोद महल्ले, जावेद मेमन व संजय शिरभाते यांचा समावेश आहे.