आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electricity News In Marathi, Consumer, Divya Marathi

वाढीव बिलांचे ‘महा’वितरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जिल्हा व शहर मिळून सहा लाखांच्या आसपास ग्राहक आहेत. मार्च महिन्यात बहुतेक ग्राहकांना ‘लॉक’ व ‘सरासरी’प्रकारचे बिल देण्यात आले आहे. वापरण्यात आलेल्या यूनिटच्या आधारे बिल देण्याचा दंडक असताना ‘लॉक’ किंवा मीटरचा फोटो नसलेले बिल देण्यात आल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.


शंभर यूनिटपेक्षा कमी विजेचा वापर केल्यास चार रुपये यूनिटप्रमाणे इंधन अधिभार मिळून बिल दिले जाते. तीनशे यूनिट वापर केल्यास सात रुपये प्रतियूनिट, तर 300 व 500 पेक्षा अधिक यूनिटचा वापर केल्यास 10 व 13 रुपये प्रतियूनिटप्रमाणे बिल आकारण्यात येते. कंत्राटदारांकडून नेमका येथेच घोळ केला जात असून, त्यामुळे ग्राहकांची लूट होत आहे.
प्रत्यक्षात कमी यूनिटचा वापर असताना बंद फाटकाचा फोटो टाकत अतिरिक्त बिलाचा बोझा ग्राहकांवर लादण्यात येत आहे. मागील काही महिन्यांच्या बिलांच्या सरासरीचा आधार घेऊन बिल आकारण्याचे टाळले जात असून, कंत्राटदारांकडून मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. मार्च एंडिंगमध्ये अधिक नफा मिळवण्याच्या या गंभीर प्रकाराबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. मनमानी बिल आल्याने त्रस्त ग्राहकांना महावितरण कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. तेथे योग्य माहिती व सहकार्य न मिळाल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय योग्य यूनिटप्रमाणे दुरुस्ती न करता कंत्राटदाराचा फायदा लक्षात घेता बिलात काही प्रमाणात बदल करण्यात येतो, अशीही अनेक नागरिकांची तक्रार आहे. सर्व प्रकारानंतर बिल भरायला उशीर झाल्यास ग्राहकांवर वीजजोडणी कापण्याची टांगती तलवार कायम राहते.


अध्र्या तासात दहा तक्रारी प्राप्त
अतिरिक्त बिलाबाबत महावितरणला दर अध्र्या तासात किमान दहा तक्रारी प्राप्त होत आहेत. डफरीन येथील महावितरण कार्यालयात मागील तीन ते चार दिवसांमध्ये तक्रारींचा हा आलेख दिसून आला आहे. ग्राहकांचे समाधान होत नसल्याने कंपनीच्या विविध कार्यालयांत भटकंती करावी लागते.

कर्मचार्‍यांचे असहकार्य
अतिरिक्त यूनिटच्या बिलाचा भुर्दंड पडू नये म्हणून ग्राहक स्वत:हून महावितरण कार्यालयात जातो, तेव्हा मात्र कर्मचार्‍यांच्या असहकार्याचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर येते. कर्मचार्‍यांकडून होत असलेला मनस्ताप सहन करत अतिरिक्त बिलाचा बोजा त्यांच्यावर पडतो.


तक्रारींचे निराकरण करू
अतिरिक्त वीज बिल आलेल्या ग्राहकांचे प्रमाण प्रत्येक महिन्यात केवळ दहा टक्के आहे. ग्राहकांना लॉक किंवा अँव्हरेज बिल आले असेल, तर महावितरणकडून दुरुस्त केले जाते. या महिन्यात नेहमीप्रमाणेच तक्रारी कायम आहेत. ग्राहकांना अतिरिक्त रकमेचे बिल आले असेल, तर तपासणी केल्यानंतर त्यात दुरुस्ती करून दिली जाईल. दिलीप मोहोड, अधीक्षक अभियंता (शहर विभाग) महावितरण.