आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये वीज खांबांना आता सुरक्षा ‘कलर कोड’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- विद्युत खांबांवर कामे करताना होणारे अपघात व नुकसान टाळण्यासाठी आता महावितरणने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत खांबांना वर्गवारीनुसार वेगवेगळे ‘कलर कोड’ राहतील. हे काम सुरू करण्यात आले आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा बिघाड झाल्यास कर्मचार्‍यांना तातडीने संबंधित परिसरात जाऊन विजेच्या खांबावर दुरुस्तीची कामे करावी लागतात. अशा वेळी विद्युत उपकरणे निकामी होणे, शॉक लागून कर्मचारी खाली पडणे असे अपघात संभवतात. एकाच खांबावर दोन्ही बाजूंनी वीजपुरवठा सुरू असल्याने अशा घटना घडतात. त्या टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना अंतर्गत अशा खांबांवर सूचना फलक लावण्यात येणार आहे. खांबावर दुरुस्तीसाठी चढणारे बहुतांश वायरमन नवखे असतात. त्यांना कुठून वाहिनी गेली, त्यावरील दाब किती व्ॉटचा आहे, याची कल्पना असली तरी प्रत्यक्ष काम करण्याचा दबाव हा अत्याधिक असतो. अशावेळी नकळत चुका होतात आणि ते जिवावरही बेतू शकते. अशातून काही घटनाही घडलेल्या आहेत. ‘कलर कोड’मुळे खांबावर चढणार्‍या कर्मचार्‍यांना त्यावरून नेमक्या कोणत्या प्रकारच्या व किती दाबाच्या वाहिन्या गेल्या आहेत, हे स्पष्ट होईल. त्याची मदत अपघात टाळण्यास होईल.

शहरात अनेक ठिकाणी ‘फोर पोल स्ट्रर’ आलेले असते. यावर दोन्ही किंवा तिन्ही बाजूने वीजपुरवठा आलेला असतो. अशा ठिकाणी नेमका कोणता वीजपुरवठा कोणत्या बाजूने आला आणि ती वाहिनी कोणत्या दिशेने जाणार, हे दर्शवणारे फलक लावण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी भूमिगत केबल, फोर पोल स्ट्रर आलेले असतात, अशा प्रत्येक केबलवर येणारी आणि जाणारी विद्युत वाहिनी व दाब ओळखता येईल असे स्पष्ट निर्देश असावेत. त्यासाठी विशिष्ट पद्धतीचे फलक लावण्यात येणार आहेत. तशा सूचना महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडून स्थानिक कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार खांबांवर ‘कलर कोड’चे काम सुरू झाले आहे.

सूचनेचे असे रंग
विद्युत खांबांना ‘कलर कोड’ देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन लघुदाब वीजपुरवठा एकाच खांबावरून असल्यास त्याला ‘हिरवा - पांढरा - हिरवा’, दोन उच्चदाब वीजपुरवठा असल्यास ‘लाल - पांढरा - लाल’ आणि एक उच्चदाब व दुसरा लघुदाब वीजपुरवठा होणार्‍या खांबाला ‘लाल- पांढरा - हिरवा’ असा रंगाचा पट्टा देण्याचे काम सध्या सुरू झाले आहे.

मदत होईल
वीजवाहिनीवर काम करताना कर्मचार्‍यांना त्या वाहिनीसंदर्भात इत्थंभूत माहिती मिळावी म्हणून ‘कलर कोड’च्या कामाला सुरुवात झाली. यामुळे अपघाताच्या घटना टाळण्यास निश्चितच मदत होईल. कर्मचार्‍यांनीदेखील काम करताना काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता, महावितरण.