आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतनासाठी कर्मचाऱ्यांचे आमदारांना साकडे..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नियमितवेतन मिळावे म्हणून महापालिका कर्मचारी / कामगार संघाच्या वतीने आमदार रावसाहेब शेखावत यांना निवेदन देण्यात आले. वेतनासाठी पैसे नाहीत, तुम्ही संपावर जाऊ शकता, असा सल्ला देणारे आयुक्त अरुण डोंगरे यांची तक्रारदेखील आमदारांकडे करण्यात आल्याची माहिती आहे. पालिका कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे वेतन रखडले आहे. अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मिळणारे वेतनदेखील तीन-तीन महिन्यांच्या फरकाने मिळत आहे. त्यामुळे आर्थिक समतोल राखताना चांगलीच कसरत करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. सोसायटी, एलआयसी, आर. डी., भविष्य निर्वाह निधी आदी कपातीची रक्कमदेखील सहा ते आठ महिन्यांपासून भरण्यात आली नाही.

कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळावे म्हणून संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. आयुक्तांची बुधवारी (दि.१७) भेट घेतली असता कर्मचाऱ्यांचे वेतन कधी होणार, हे सांगता येणार नाही, तूर्तास पालिकेची वेतन देण्याची आर्थिक स्थिती नाही, असे व्यक्तव्य आयुक्तांनी केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवावा, याचा प्रश्नदेखील त्यांना पडला आहे.

वेतनाशिवाय कर्मचाऱ्यांकडे अन्य पर्याय नसून शिक्षण, आजारपण, अन्न, वस्त्र आदी मूलभूत गरजा भागवणे कठीण झाले आहे. सतत वेतनाची अनियमति‍ता झाली असल्याने कर्मचाऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. वारंवार विनंती करूनही पगार झाल्याने कर्मचारी नाराज आहेत.