आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचा-याच्या मृत्यूने ‘सोफिया’मध्ये तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- लोखंडीप्लेट डोक्यावर पडून श्रमिकाचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त कर्मचा-यांनी सोमवारी ‘सोफिया’ प्रकल्पामध्ये तोडफोड करत कामबंद आंदोलन केले. परिस्थिती चिघळण्याची लक्षणं बघून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आल्यावर संतप्त कर्मचाऱ्यांना शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
लटपट गोसावी (51, रा. प. बंगाल) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रविवारी नियमितपणे कामावर आल्यावर सकाळी अकराच्या सुमारास दुसऱ्या माळ्यावरून त्यांच्या डोक्यावर लोखंडी प्लेट पडली. रक्तबंबाळ अवस्थेत इतर कर्मचा-यांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. यामुळे कर्मचारी संतप्त झाले. मृताच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी या प्रसंगी ‘सोफिया’तील अधिका-यांना केली. मात्र, अधिका-यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी प्रकल्पामध्ये तोडफोड करून कामबंद केल्याचे सूत्रांकडून समजते. घटनेची माहिती मिळताच माहुली पोलिस ठाण्यातील पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाल होते. चिघळलेली परिस्थिती पाहून या वेळी अतिरिक्त पोलिस पथक पाचारण करण्यात आले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना त्वरित मदत देण्याच्या मागणीवर कर्मचारी कायम असून, ताेपर्यंत लढा देणार असल्याचे त्यांनी म्हटले अाहे.