अमरावती- औषधी गुणधर्म असलेल्या बहुगुणी पानपिंपरी या पिकाला मर रोगाने गिळंकृत केल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांनी गुरुवारी (दि. 6) जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांची भेट घेऊन आर्थिक मदतीची मागणी केली.
जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मनोहर सुने यांच्या नेतृत्वात पानपिंपरी उत्पादकांनी गुरुवारी सकाळी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. या वेळी ही मागणी करण्यात आली. वर्षभराच्या मशागतीनंतर प्राप्त होणारे हे पीक प्रामुख्याने अंजनगावसुर्जी तालुक्यात घेतले जाते. गतवर्षी तेथील 1,320 शेतकर्यांनी एकत्रितपणे ही शेती केली; परंतु मध्येच झालेल्या मर रोगाच्या आक्रमणामुळे सुमारे 80 टक्के पीक नष्ट झाले. हे नुकसान सहन करण्यापलीकडचे असल्याने शासनाने इतर शेतकर्यांप्रमाणेच आम्हालाही मदत करावी, अशी मागणी पानपिंपरी उत्पादकांनी केली. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनानुसार, या पिकाचा उत्पादन खर्च प्रतिकिलो 433 रुपये येतो, तर उत्पादन हेक्टरी 1,325 किलोग्रॅम होते. हे पीक घेताना लागवड, मशागत, कापणी-तोडणी व वाळवण असे अनेक टप्पे पार पाडावे लागतात. त्यानंतर कुठे रक्कम हाती लागते. यासाठी मनुष्यबळावरही प्रचंड खर्च होतो. जिल्हाधिकार्यांनी या सर्व बाबी ऐकून घेऊन योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या वेळी पानपिंपरी उत्पादक नियोजित संस्थेचे सदस्य मनोहर मुरकुटे, सुभाष थोरात व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.