आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Engineering Examination News In Marathi, Failure, Divya Marathi , Student

इंजिनीअरिंगचे 4 हजार विद्यार्थी नापास,त्रुटीपूर्ण मूल्यांकन पद्धतीचा फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावती विद्यापीठातील विविध विद्याशाखांमधून इंजिनीअरिंग करत असलेल्या सुमारे चार हजारांवर विद्यार्थ्यांच्या भाळी ‘नापास’चा शिक्का लागला आहे. पूर्णवेळ प्राध्यापकांनी मूल्यांकनाकडे सपशेल पाठ फिरवली आहे. त्यामुळे तासिकातत्त्वावर काम करणार्‍यांकडून पेपर तपासणी करून घ्यावी लागत आहे. मूल्यांकन करणारे तज्ज्ञ नसल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.


नापास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी असे आहेत, ज्यांना बालवाडीपासून आजपर्यंत नापास हा शब्दच माहीत नव्हता. परिणामी, इंजिनीअरिंगच्या प्रत्येक सेमिस्टरचा निकाल जाहीर झाल्यानंतर पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज भरणार्‍यांची संख्या सर्वाधिक ठरत आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार, कोणत्याही विद्याशाखेचे पेपर तपासण्यासाठी पूर्णवेळ ‘अँप्रुव्हड’ प्राध्यापकांची नेमणूक केली जाणे बंधनकारक आहे. मूल्यांकनासाठी ‘अँप्रुव्हड’ प्राध्यापकच येत नसल्याने मिळेल त्या प्राध्यापकांच्या मदतीने विद्यापीठ इंजिनीअरिंगचे पेपर तपासत आहेत. यंदा परीक्षकच न मिळाल्याने सुमारे एक लाख पेपर तपासणीचा निकाल विलंबाने जाहीर झाला. त्याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने नऊ मार्चच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर विद्यापीठाने निकाल जाहीर केले खरे, परंतु त्रुटीपूर्ण तपासणीचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.

नापासच्या ठप्प्याचा परिणाम
एकापेक्षा जास्त गुणपत्रिकांमुळे नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या अशा इंजिनीअर्सला असक्षम ठरवत नोकर्‍या नाकारतात.
विद्यार्थ्यांचे मनोबल खचते. पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास प्रत्येक विषयासाठी 200 रुपये मोजावे लागतात. त्रुटीपूर्ण मूल्यांकनामुळे यंदा बहुतांश विद्यार्थी किमान दोन ते चार विषयांत नापास झाले आहेत.
प्राध्यापकच नसल्याने पेपर तपासायला विलंब होत आहे. परिणामी, निकाल विलंबाने जाहीर होतो. त्यातच पुनर्मूल्यांकनासाठी प्रचंड विलंब होत असल्याने पुढील शिक्षणात अडथळे.


पेपर तपासणीचा व्याप
जमा होणार्‍या उत्तरपत्रिका : 01.15 लाख
दररोज लागणारे व्हॅल्यूअर : 30
मिळणारे व्हॅल्यूअर : 10 ते 15
रोज एक व्हॅल्यूअर तपासतो : 20 पेपर

कॉलेजेस अन् विद्यार्थी..!
एम.ई. । एम.टेक. : 19 कॉलेज : 1,577 विद्यार्थी
बी.ई. । बी. टेक. : 28 कॉलेज : 10,860 विद्यार्थी


नापासांची संख्या वाढली
इंजिनीअरिंगच्या पेपर तपासणीचा पेच आहेच. आम्ही प्राचार्य, प्राध्यापकांना पत्र देऊन थकलो. यंदा प्रचंड प्रमाणावर पुनर्मूल्यांकनाचे अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच त्यावर तोडगा काढला जाईल. डॉ. जे. डी. वडते, परीक्षा नियंत्रक