आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • European Impressed On Yoga , ' Lessons Will Take In HVPM

योगा’ने युरोपियन प्रभावित,‘एचव्हीपीएम’मध्ये घेणार धडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सशक्त अन् लवचिक शरीरासाठी भारतीय योगासनांचे सामर्थ्य युरोपियन लोकांनीही पुरेपूर ओळखले असून ‘खेळांचे माहेरघर’ अशी ख्याती असलेल्या अंबानगरीतील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात डेन्मार्क आणि सेशल्स येथील काही क्रीडा तज्ज्ञ योग तसेच भारतीय पारंपरिक खेळांचे आठ ते 25 जानेवारी या कालवधीत प्रशिक्षण घेणार आहेत.

डेन्मार्कच्या गेर्लेव्ह शरीरातील स्पोर्ट्स अकादमीशी गेल्या वर्षीच्या ग्लोबल कॉन्फरन्सच्या वेळी एचव्हीपीएमने फिजिकल कल्चर (शारीरिक संस्कृती) तसेच पारंपरिक खेळ, योग यांचे आदानप्रदान करार केला होता. त्याअंतर्गतच अकादमीचे संचालक लार्स हॅजलटन तसेच सेशल्स येथील फ्रान्सिस रेमी, स्टीव्ह थेलमाउंट आणि चार्लोट ग्रँगियर सुमारे 17 दिवस एचव्हीएमचा पाहुणचार घेत बैठे, पोटावर, पाठीवर आणि पायावर करायची आसनं यांचे प्रशिक्षण संचालक डॉ. सुरेश देशपांडे, डॉ. अरुण खोडस्कर, नॅचरोपॅथी विभागाचे प्रमुख डॉ. सूर्यकांत पाटील, नागपूरचे योगतज्ज्ञ डॉ. केशव क्षीरसागर, प्रा. संजय मराठे, डॉ. पी.एन. रोंगे (शरीर विज्ञानतज्ज्ञ ),डॉ. एम.व्ही. भोळे (आंतरराष्‍ट्रीय ख्यातीचे योगतज्ज्ञ, लोणावळा) देणार आहेत. विशेष बाब अशी, की लार्स हॅजलटन हे एचव्हीपीएमच्या विद्यार्थी नि:शुल्क सेवा दिली जात असूनही, अमरावती शहरातील फारच कमी नागरिक योग प्रशिक्षण घेण्यासाठी एचव्हीपीएम येथे येत असतात. मात्र, आता विदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर योग प्रशिक्षण घेण्यासाठी विचारणा करीत असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. पाश्चिमात्य देशांना एव्हाना भारतीय योगासन, संस्कार आणि संस्कृतीचे महत्त्व पटायला लागले असून, शरीराला बळकट करायचे असेल तर योगासनांशिवाय पर्याय नाही, हेदेखील त्यांनी ओळखल्याची माहिती त्यांनी दिली.
डॉ. सुरेश देशपांडे आणि डॉ. अरुण खोडस्कर हे भारतीय व्यायामपद्धती, योगासन आणि मल्लखांबचा प्रचार व प्रसार करण्यासाठी युरोप, आफ्रिका आणि आशियाई देशांचे दौरे करीत असतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे आता ब-याच ठिकाणी योग आणि मल्लखांबविषयी आवड निर्माण झाली आहे. केनिया आणि मॉरिशसने तर डॉ. खोडस्करांना आमंत्रित केले आहे. विदेशी पाहुण्यांना लेझिम, गिल्ली-दंडा, बनेठीसारख्या अन्य काही भारतीय खेळांचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे.

मयूर, नरेंद्र करताहेत मल्लखांबचा प्रचार
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात मल्लखांबमध्ये पारंगत झालेले दोन खेळाडू मयूर दलाल आणि नरेंद्र गाडे सध्या युरोपातील ओल्डेनबर्ग, हॅनोवर, ब्रेमेन, डॉर्टमंड, हॅलेसाले, लेपझिग, कॅसेल, बॅमबर्ग, मंचेन, फ्रँकफर्ट, वेट्झलर, बीलेफिल्ड, रोस्टॉक, हॅम्बर्ग, बर्लिन, गॉटिंजेन, मिंडेन, ब्राउनश्वेग या शहरांमध्ये मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर करीत असून, युरोपियन टीव्हीवरही ही प्रात्याक्षिके ‘सुपरहिट’ ठरली आहेत. जर्मन टूर्स अँड कॉन्फरन्सस (जीटीसी)या कंपनीसोबत असलेल्या मैत्री कराराच्या अनुषंगाने मयूर व नरेंद्रला जर्मनीत मल्लखांबचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आहे.