आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आयपीएलपटूने दिले अमरावतीच्या नवोदितांना धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आयपीएलच्या राजस्थान रॉयल्समध्ये राखीव खेळाडू म्हणून निवड झालेल्या अन् विश्वातील दिग्गज क्रिकेटपटूंसोबत सराव करण्याचा अनुभव मिळवणाऱ्या अमरावतीच्या सुयोग सहस्रबुद्धेने मारुती क्रिकेट अकादमीच्या (एमसीए) उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरात नवोदित आणि शालेय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बेसिक्स, आहार आणि तांत्रिक धडे दिले.
तत्पूर्वी १५ एप्रिलपासून समता कॉलनी, नानीबाई महाविद्यालय, रंगोली लॉनजवळ सुरू झालेल्या एमसीएच्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे औपचारिक उद््घाटन रविवारी सायंकाळी झाले. अध्यक्षस्थानी बाळ कोपरे हे होते, तर मुख्य अतिथी म्हणून माजी आयपीएलपटू सुयोग सहस्रबुद्धे होते. मुख्य प्रशिक्षक अविनाश वाकोडे यांनी प्रास्ताविक केले. मैदानावर खेळाडू प्रशिक्षकांनी गेला एक महिनाभर परिश्रम करून उभारलेल्या खेळपट्टीचे ज्येष्ठांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
याप्रसंगी सर्व उपस्थितांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना शिस्तीने खेळा, खेळालाच साधना समजून प्रशिक्षक सांगतील त्या सूचनांचे पालन करा, सकस आहार घ्या, फास्टफूड जंक फूड तसेच कोल्डड्रिंक घेणे टाळा असे उपयोगी मार्गदर्शन केले, तर सुयोगने खेळात नियमितपणा, जिद्द कशी असावी, कोणत्या पदार्थांचे सेवन करायचे, ग्लुकोज वॉटर सोबत आणायचे अशा आवश्यक सूचना दिल्या. राज्याचे शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारे निर्मल शेरेकरसारखे खेळाडू घडवणाऱ्या एमसीएच्या क्रिकेट शिबिराचे अविनाश वाकोडे हे मुख्य प्रशिक्षक आहेत. ३५ दिवसांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर १५ एप्रिल ते २० मे या कालावधीत चालणार आहे. याशिवाय येथे नियमित प्रशिक्षणही दिले जाणार आहे. सकाळी ते अन् सायंकाळी ते या अशा दोन सत्रांत घेतल्या जाणाऱ्या शिबिरात तज्ज्ञ प्रशिक्षकांसोबतच अतिथी प्रशिक्षकही मार्गदर्शन करतील. यासोबतच कामगिरीचे व्हिडीओ विश्लेषणही खेळाडूंना दाखवले जाईल.

सहस्रबुद्धे ठरला खेळाडूंचे आकर्षण

राजस्थान रॉयल्सकडून गेल्या मोसमात खेळलेल्या शेन वॉटसनवर धारदार मारा करून सुयोग सहस्रबुद्धेने सरावादरम्यान चांगलेच बेजार केले होते. विशेष म्हणजे त्याच्या एका भन्नाट बाउंसरने वॉटसनच्या हेल्मेटचाच वेध घेतला होता. अशा या गोलंदाजाने एमसीएच्या शिबिरात स्वत: नेट्समध्ये फलंदाजांना सराव दिला.
सुयोगने संत गाडगेबाबा अमरावतीचे विद्यापीठाचे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व केले असून, त्याने गझदर लीग क्रिकेटमध्येही धारदार गोलंदाजी केली आहे. त्याचे धडे खेळाडूंना उपयोगी ठरतील.

प्रथम श्रेणीच्या खेळाडूंचे मार्गदर्शन

शिबिरा दरम्यान प्रथमश्रेणीचे खेळाडू त्यांचे अनुभव कथन करतील. एवढेच नव्हे, तर माइंड काउंसेलिंग आणि खेळाडूंनी कसा सकस आहार घ्यावा, याचेही मार्गदर्शन केले जाईल. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टिरक्षणाचे बेसिक्स यांवर येथे भर दिला जाणार आहे. मॅट आणि टर्फ अशा दोन्ही प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सराव शिबिरार्थींना दिला जाईल. खेळाडू तंदुरुस्त असावेत म्हणून सर्वप्रथम त्यांच्याकडून योग्य व्यायाम करून घेतला जात आहे. खेळाडूंना क्रिकेटचा पोशाखही एमसीएकडून दिला जाणार आहे.

चिमुकल्यांमध्ये उत्साह

समता कॉलनीतील मैदान एक महिन्यापूर्वी खेळण्याच्या स्थितीत नव्हते. मात्र, शिबिरातील ५० लहान-मोठ्या खेळाडूंसोबतच प्रशिक्षकांनी आधी संपूर्ण मैदान स्वच्छ केले. झाडून कचरा, प्लॅस्टिक उचलण्यात आले. त्यानंतर सर्वांनी काटेरी खुरटी झाडे उपटून फेकली. खड्डे बुजवले. मैदान समतोल केले. त्यानंतर रोलर फिरवून ते सुस्थितीत आणले. आता तेथे एक फर्ट विकेट तयार झाली आहे. पावसामुळे ही विकेट खराब झाली होती. त्यानंतर पुन्हा सर्वांनी हातभार लावत ती खेळण्यासाठी तयार केली. चिमुकल्यांच्या उत्साहामुळे हे मैदान खेळण्यासाठी तयार झाले आहे.