आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी उपमहापौराने रोखली नगरसेवकावर रिव्हॉल्व्हर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर शेख जफर यांनी गुरुवारी काही कार्यकर्त्यांसमवेत येऊन वाद घातला आणि आपल्यावर रिव्हॉल्हर रोखल्याचा आरोप नगरसेवक अ. रफिक अ. रज्जाक यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी शहर कोतवाली ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरुवारी (दि. 6) रात्री शेख जफरसह सात जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

इर्विन चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावर गुरुवारी दुपारी अ. रफिक काही कामानिमित्त आले होते. त्यावेळी नगरसेवक शेख जफर आपल्या सहकार्‍यांसोबत या ठिकाणी आला. अ. रफिक व शेख जफर यांच्यात या प्रसंगी शाब्दिक चकमक उडाली. अ. रफिक व त्यांच्या सहकार्‍याला शेख जफर व त्याच्या सर्मथकांनी मारहाण केली. संतप्त शेख जफरने रिव्हॉल्वर कानावर रोखून जिवानिशी मारून टाकेल, अशी धमकी दिल्याचा आरोप अ. रफिक यांनी केला आहे. या घटनेनंतर जवळपास चार तासांनी तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी शेख जफर, शारिक, अजहर मिर्झा बिस्कर यांच्यासह तीन ते चार जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण असा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी या पैकी दोघांना ताब्यात घेतले.

मोहीम फिस्कटली
शेख जफर याने मागीलवर्षीसुद्धा रिव्हॉल्हवरमधून गोळी झाडली होती. त्यानंतर त्याला अटक झाली होती. गुरुवारी पुन्हा त्याने रिव्हॉल्व्हर काढल्याचे पुढे आले. म्हणून कोतवाली पोलिस आणि गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी रात्रीच गोपनीय ऑपरेशन राबवून शेख जफरला पकडण्याची तयारी केली होती. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम, कोतवालीचे ठाणेदार विजय सांळुके आपआपल्या पथकासह मोहिमेवर रवाना होत असतानाच काही पोलिसांनीच, आम्ही त्याच्या घरी आलो असून, तो घरी नाही, अशी माहिती दिली. गुन्हे शाखा आणि कोतवाली पोलिसांचे हे गोपनीय ऑपरेशन इतर पोलिसांना माहीत कसे झाले? पोलिसांचे पथक पोहोचण्यापूर्वीच आयुक्तालयात कार्यरत काही कर्मचारी जफरच्या घरी जाऊन तो घरी नसल्याची माहिती कशी काय देतात? या प्रकाराने गोपनीय ऑपरेशन राबवण्याची तयारी करणार्‍या कर्मचारी, अधिकार्‍यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. पोलिसांनीच पोलिसांची ही मोहीम ‘फेल’ केल्याची चर्चा शुक्रवारी पोलिस ठाण्यात होती.