आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये नाही एकही उपद्रवी परीक्षा केंद्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांचा पूर्वेतिहास बघून परीक्षा मंडळाने काही केंद्रांना ‘उपद्रवी’ घोषित केले होते. मात्र, त्या केंद्रांमध्ये सुधारणा झाल्याने परीक्षा मंडळाने त्यांच्यावरील ‘उपद्रवी’ शिक्का पुसून टाकल्याने जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र आता अनुपद्रवी श्रेणीत आले आहेत.


ग्रामीण किंवा शहरात मोठय़ा प्रमाणात कॉपी चालत असलेल्या केंद्रांना उपद्रवी केंद्रांच्या र्शेणीत टाकण्यात आले होते. त्यामुळे परीक्षेच्या काळात इतर केंद्रांच्या तुलनेत या केंद्रांवर परीक्षा मंडळ, भरारी पथकांचे विशेष लक्ष असायचे. कालांतराने त्या केंद्रांमध्ये सुधारणा झाल्यानंतरही परीक्षा मंडळाच्या यादीत ते केंद्र ‘उपद्रवी’ म्हणूनच नमूद होते. यावर्षी दहावी, बारावीचे सर्व परीक्षा केंद्र एकसारखेच असून, कोणतेही केंद्र उपद्रवी नाही. या पार्श्वभूमीवर उपद्रवी केंद्रांची यादी नव्याने यादी तयार करण्यात येणार आहे.


हमीपत्र घेऊन उपद्रवी र्शेणीतून सुटका
उपद्रवी केंद्रांवर मागील दोन ते तीन वर्षात कॉपीप्रकरण नाही. त्यांनाच यादीतून वगळण्यात आले असून तसे पत्र राज्य परीक्षा मंडळाकडूनही प्राप्त झाले होते. त्यामुळेच उपद्रवी केंद्र रद्द केले आहेत. मागील वर्षी दहावीचे 18 आणि बारावीचे 14 उपद्रवी केंद्रे होती. मागील वर्षी ज्या केंद्रांवर कॉपीचा प्रकार झाला, त्या केंद्राधिकार्‍यांना बोलावून आम्ही हमीपत्र घेतले आहे. मात्र, कॉपीचे प्रकार आढळल्यास नव्याने यादी करण्यात येईल, अशी माहिती अमरावती परीक्षा मंडळाचे विभागीय अध्यक्ष संजय गणोरकर यांनी दिली.

20 फेब्रुवारीपासून बारावी, तर तीन मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले कॉपीमुक्त अभियान यंदाही राबवण्यात येणार आहे. या अभियानासाठी जिल्ह्याधिकार्‍यांच्या नेतृत्वात दक्षता समिती असते. सोबतच शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक यांचे स्वतंत्र पथक आणि परीक्षा मंडळाचे भरारी पथक परीक्षा काळात कार्यरत राहणार आहेत.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी परीक्षा मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत. शुक्रवारी (दि. 7) झालेल्या बैठकीला अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा आणि अकोला जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते. परीक्षेदरम्यान, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना या वेळी परीक्षा मंडळाने दिल्या आहेत.