अमरावती-परीक्षेचा काळ सुरू असल्याने विद्यार्थी परीक्षेत गर्क आणि पालक त्यांच्या दिमतीला, असे वातावरण घराघरांत आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने हा काळ बाजारपेठेतील व्यावसायिकांसाठीही ‘परीक्षा’च ठरत आहे. अमरावती शहरात एकूण लोकसंख्येच्या 42.36 टक्के प्रमाण तरुणाईचे आहे. म्हणूनच परीक्षेमुळे हा तरुण वर्ग सध्या व्यस्त आणि बाजारपेठेतील व्यापारी त्रस्त आहेत.
चित्रपटगृह, रेस्टॉरेंट, मोबाइल बाजार आणि कापड बाजारावरही परीक्षांचा परिणाम दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ अभ्यासातच जात असल्याने मोबाइल, सोशल साइट, व्हॉट्स अँपवरील त्यांचे ‘हॅपी अवर्स’ही कमी झाले आहेत. फेब्रुवारी ते एप्रिल हा परीक्षेचा काळ. दहावी, बारावी, शालांत परीक्षा, विद्यापीठाच्या परीक्षा असा क्रम या काळात असतो. त्यामुळे वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात दिवसातून किमान एकदा तरी पाऊल टाकणारा हा वर्ग सध्या दिसेनासा झाला आहे.
ग्राहक संख्या रोडावली
दररोज किमान 80 ते 100 मुली कोणती ना कोणती साधने, सौंदर्य प्रसाधने घेण्यासाठी येतात. टिकली, नेलपॉलीश, लीपस्टिक, डीओची विक्री त्यातून होते. परंतु, परीक्षेच्या काळात ग्राहक संख्येवर परिणाम जाणवतो. परीक्षा सुरू झाल्यापासून तरुण ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे. भास्कर मुल्लर, कॉस्मेटिक्स विक्रेता
कुठे किती तरुणाई?
गाडगेनगर : 3325
राजापेठ : 5565
कॅम्प परिसर : 2352
विद्यापीठ परिसर : 4385
एचव्हीपीएस परिसर : 968
बडनेरा : 1325
दस्तुरनगर : 2124
व्हीएमव्ही परिसर : 3567
गेटआतील परिसर : 2546