आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांनी सादर केलेल्‍या कवायतींनी, डोळ्यांचे फिटले पारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील ग्रीष्मावकाश शारीरिक शिक्षक अन् विविध क्रीडा शिबिरांतील खेळाडूंनी अँरोबिक्स, डंबेल्स, दोन हाती तलवार, भाला, लाठी फिरवणे, रोप मल्लखांब, जुदो, योगासने, जिम्नॅस्टिक्स, लाकडी मल्लखांब, जळती बनेटीच्या सुमारे तीन तास रंगलेल्या चित्तथरारक कवायतींद्वारे प्रेक्षकांना रिझवले.
मंगळवारी (दि. 27) सायंकाळी रंगलेल्या समारोपीय सोहळ्यात कल्याण, मुंबईपासून ते अगदी आदिवासी भागातील खेळाडूंनी विविध खेळांचे बहारदार प्रात्यक्षिक सादर केले. अँरोबिक्सच्या नेत्रदीपक कवायतींनंतर मार्शल आर्टचे प्रात्यक्षिक डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. चार खेळाडूंच्या अंगावरून झेप घेत मुलींनी सादर केलेले आत्मरक्षणाचे करतब हृदयाचा ठाव घेणारे ठरले. यानंतर झालेल्या विटाफेक आणि शेकडो चिमुकल्यांच्या डंबेल्स कवायतींनीही सर्वांना खिळवून ठेवले. राजू महात्मे यांचे भाला फिरवण्याचे प्रात्यक्षिक असो किंवा एका महिलेने सादर केलेली लाठी कवायत, प्राचीन भारतीय खेळ कसे देखणे होते, याची साक्षच ते पटवत होते.
शिबिरार्थींनी दोन हाती तलवार फिरवत साकारलेला युद्धभूमीचा देखावा, मुलींनी मल्लखांबाच्या कवायतींमध्ये दाखवलेले कौशल्य, मनोरे, जुदोचे डाव, विविध अचूक योगासनेही नेत्रदीपक होती. मागील दोन महिन्यांपासून शिबिरार्थी जिम्नॅस्टिक्सचे धडे घेत होते. त्यांच्या दमदार सादरीकरणाने प्रेक्षकही भारावून गेले. समरसॉल्ट बॅक, डबल, समरसॉल्ट 270, 360 अंशाचेही रोमांचक प्रदर्शन घडवण्यात आले.

मयूर दलाल, नरेंद्र गाडे यांनी मल्लखांबाला र्जमनीत लोकप्रिय बनवले. त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या खेळाडूंनी सुरेख मनोरे उभारले. सोबतच तलवार, मशाली हाती घेऊन नेत्रदीपक कवायतींनी सर्वांना रोमांचित केले. प्रा. रवि दलाल यांच्या जळत्या बनेटीच्या चित्तथरारक कवायतींना उपस्थितांची भरभरून दाद मिळाली.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत मराठे होते. या प्रसंगी मंडळाचे संचालक डॉ. सुरेश देशपांडे, सचिव प्रा. माधुरी चेंडके, डीसीपीईचे प्राचार्य डॉ. सुभाषचंद्र शर्मा, माजी प्राचार्य वसंत हरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. विजय पांडे यांनी संचालन केले. शिबिर संचालक डॉ. उदय भांडारे यांनी आभार मानले.