आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • External Party Candidates,Latest News In Divya Marathi

पक्षाबाहेरचे उमेदवार; इच्छुकांमध्ये चलबिचल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भाजपसोबत राजकीय संबंध नसलेल्या इतर राजकीय पक्षनेत्यांचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार असल्याच्या चर्चेमुळे भाजपमधील निष्ठावंत इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम पसरला आहे. केंद्रातील सत्ता परिवर्तनानंतर भाजपमध्ये प्रवेशास इच्छुकांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सत्तापटावर नजर ठेवून पक्षप्रवेश करणार्‍यांना भाजप पक्षर्शेष्ठींनी ‘रेड सिग्नल’ दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्य पक्षांतून भाजपात येणार्‍यांवर ‘ब्रेक’ लागण्यासोबतच पक्षात वर्षानुवर्षे एकनिष्ठेने कार्य करणार्‍या सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची तरतूद पक्षर्शेष्ठींनी केल्याचे समजते. केंद्रात सत्तापरिवर्तनानंतर देशासह राज्यातही ‘मोदी इफेक्ट’ जोर धरू लागल्याने भाजपमध्ये येण्यास इच्छुकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी नोंदवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धाही सुरू झाली आहे. ‘गॉडफादर’चा माध्यमातून प्रत्येकाने आपली ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, काँग्रेसचे माजी आमदार व सध्या जनविकास काँग्रेसचे सर्वेसर्वा डॉ. सुनील देशमुख, राष्ट्रवादीतून बाहेर पडून वर्‍हाड विकास मंचची चूल मांडणारे संजय खोडके आणि उद्योजक लप्पी जाजोदिया यांच्या भाजपमधील संभाव्य प्रवेशाच्या चर्चेमुळे शहरातील राजकीय क्षेत्रात तर्कवितर्काची चक्र जोरात फिरू लागली आहेत.पक्षाबाहेरील नेत्यांना तिकीट देण्यात आल्यास पक्ष व संघटनेसाठी वर्षे घालवणार्‍या भाजपमधील प्रामाणिक नेते व कार्यकर्त्यांच्या राजकीय भविष्याचे काय, अशी चर्चा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
नव्या चेहर्‍यांना पक्षामध्ये ‘डेड लॉक’

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून आमदार झालेले प्रवीण पोटे यांच्या माध्यमातून भाजपला बहुजन समाजाचे नेतृत्व मिळाले आहे. भाजपच्या स्थापनेपासून पक्षात असलेले जगदीश गुप्ता हे चार वर्षांनंतर पुन्हा पक्षात परतलेत. तर यापूर्वी अचलपूरमधून विधानसभेची तयारी करणारे भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी नगरसेवक झाल्यावर विधानसभेची तयारी चालवली आहे. या तिघांसह किरण पातूरकर, दिनेश सूर्यवंशी, प्रा. रवींद्र खांडेकर, किरण महल्ले अशी अनेक नावे चर्चेत आहेत. पक्ष नव्या उमेदवारांना तिकीट देत असेल, तर जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावतील का, याचाही प्रामुख्याने विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे सध्या तरी नव्या चेहर्‍यांना भाजपमध्ये ‘डेड लॉक’ असल्याचे चित्र बघायला मिळतेय.