आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काटेपूर्णा प्रकल्पातून आरक्षित पाण्याची उचल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काटेपूर्णा प्रकल्पात शहरासाठी 15 जुलैपर्यंत 14.45 दशलक्ष घनमीटर आरक्षित जलसाठय़ाची पूर्ण उचल महापालिका पाणीपुरवठा विभागाने केली आहे. परिणामी, यापुढे पाण्याची उचल करताना दहा टक्के अधिक पाणीपट्टी भरावी लागणार आहे. दैनिक ‘दिव्य मराठी’ने 28 मेच्या अंकात 15 जुलैपर्यंत आरक्षित असलेल्या 14.45 दशलक्ष घनमीटरपैकी मे महिन्यापर्यंत 12.77 दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल झाल्याने केवळ 24 दिवसांचा जलसाठा शिल्लक राहिला आहे, असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेला महागात पडला आहे.

काटेपूर्णा प्रकल्पात अकोला शहरासाठी एकूण 24 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. यापैकी दरवर्षी साधारणपणे 20 दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण केले जाते. हे आरक्षण दोन टप्प्यात केले जाते. 16 जून ते 31 ऑक्टोबर असा पहिला टप्पा तर 1 नोव्हेंबर ते 15 जुलै दुसरा टप्पा. यासाठीच ऑक्टोबर महिन्यात पालकमंत्री, जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन पाणी आरक्षणाची बैठक घेतली जाते. ऑक्टोबर 2013 ला झालेल्या बैठकीत नोव्हेंबर ते 15 जुलै या कालावधीसाठी 14.45 दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण निश्चित केले होते. आरक्षण लक्षात घेऊन पाण्याची उचल केली जाते. परंतु, आरक्षणाकडे दुर्लक्ष करून अधिक पाण्याची उचल केल्याने जलसाठा संपुष्टात आला आहे.
दंडाचाही करावा लागणार भरणा
महापालिकेला अकोला पाटबंधारे विभागाला एक दशलक्ष घनमीटरसाठी दोन लाख दहा हजार रुपये पाणीपट्टी द्यावी लागते. आरक्षित जलसाठय़ाची पूर्ण उचल केल्याने आता प्रत्येक दशलक्ष घनमीटर पाण्यावर 20 हजार रुपयांपेक्षा अधिक दंडाचा भरणा महापालिकेला करावा लागणार आहे.
पाणी द्यावेच लागेल
4काटेपूर्णा प्रकल्पातील आरक्षित साठय़ाची पूर्ण उचल झाली असली तरी प्रकल्पात जलसाठा आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या नियमानुसार दंड आकारला जाणार असला तरी पाटबंधारे विभागाला महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून दंड आकारू नये, अशी विनंती केली जाईल. कारण शेवटी कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पाणी द्यावेच लागेल.’’ अजय गुजर, शहर अभियंता महापालिका, अकोला.
मार्चपासून अधिक उचल
तांत्रिक दुरुस्त्या तसेच पाणी वितरणातील दोष आणि जलकुंभांची कमी संख्या यामुळे प्रशासनाने पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. परंतु, मुबलक जलसाठा असताना पाच दिवस पाणीपुरवठा का, असा प्रश्न उपस्थित करून पदाधिकार्‍यांसह नगरसेवकांनी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने मार्च महिन्यापासून पाण्याची अधिक उचल करावी लागली. पाणी उचलण्याचे नियोजन कोलमडले.