आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदानानंतर आता नेत्रदानात होईल अमरावतीची आघाडी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- रक्तदानाच्या क्षेत्रात राज्यात अग्रणी असलेली अमरावती यापुढे नेत्रदानाच्या नावाने ओळखली जाईल, असा संकल्प हरिना नेत्रदान समितीने केला आहे.
दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या समितीने आतापर्यंत 400 जणांना दृष्टी प्रदान केली असून, भविष्यात हे कार्य ‘आय बँक’ स्थापन करेपर्यंत वाढवण्याचा या समितीचा मनसुबा आहे. त्यासाठी येत्या 10 जून या जागतिक नेत्रदान दिनी संकल्प रॅली व विशेष कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे समितीच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
हरिना नरेश सोनी या तीन वर्षीय मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. तिच्या नेत्रदानानंतर ही समिती स्थापन करण्यात आली असून, आतापर्यंत अनेक जणांनी नेत्रदान केले असून, सुमारे 400 रुग्णांना दृष्टी प्रदान केल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष मनोज राठी, सचिव अमित चांडक, उपाध्यक्ष चंद्रकांत पोपट व सुनील मंत्री, कार्यकारिणी सदस्य प्रशांत राठी, आकाश वसानी, नीरज गांधी, सुनील मंत्री, आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश जैन, डॉ. मोहना कुळकर्णी, रश्मी नावंदर, सुरेखा लुंगारे, हिमांशू वेद, राजेंद्र भंसाली, शरणपालसिंह अरोरा, डॉ. गुणवंत डहाणे, मगन बांठिया, प्रमोद राठी, बकुल कक्कड आदी उपस्थित होते.
प्रत्यारोपणाची सोय नाही : अमरावतीत डोळ्यांची शल्यक्रिया होते; परंतु प्रत्यारोपणाची सोय उपलब्ध नाही. समितीने त्यासाठीही पुढाकार घेतला असून, भविष्यात नेत्रपेढी व त्याहीपुढे जाऊन थेट प्रत्यारोपणच करता येईल, अशी तयारी सुरू केली आहे. सध्या अमरावतीत दान केले गेलेले नेत्र नागपूर येथील महात्मे नेत्रपेढीला पाठवले जातात. तेथून पुढे हैदराबाद व जालना येथे पाठवून त्या नेत्रांचे गरजूंवर रोपण केले जाते.