आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खानापूर मेंढीच्या हतबल शेतक-याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरूड - अतिवृष्टीने घर खचले. दुष्काळी स्थिती, नापिकी कर्जाच्या ओझ्याने प्रपंचाचा गाडा खिळखिळा होऊन ओढणेच कठीण झाल्यामुळे तालुक्यातील खानापूर मेंढी येथील शिवहरी वामनराव ढोक (४५) या शेतक-याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांनी लिहून ठेवलेल्या दोनपैकी एका चिठ्ठीत शासनाने दुर्लक्ष केल्याचे म्हटले आहे.
तालुक्यातील खानापूर मेंढी येथील शिवहरी ढोक यांच्याकडे तीन एकर कोरडवाहू शेती आहे. यावर्षी अल्प पावसामुळे त्यांना किरकोळ उत्पादन झाले. या उत्पादनात कोणताच खर्च भागवणे शक्य नव्हते. सातत्याने शेतीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगरही प्रचंड वाढला होता.दोन लाख ५० हजार रुपये, वरुड अर्बन बँकेचे सव्वालाख रुपये, महिंद्रा फायनान्स कंपनीचे दीड लाख खासगी सावकाराचे दोन लाख रुपये असे एकूण सव्वासात लाख रुपयांचे कर्ज होते, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. यातच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने त्यांचे घर कोसळले होते. अशा भयानक स्थितीत शासनाकडून कोणताच ठोस आशेचा किरण दिसत नसल्यामुळे ते हताश झाले होते. या विवंचनेतच त्यांनी शनिवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास शेतात जाऊन विष प्राशन केले. आज पहाटेच्या सुमारास त्यांच्या शेताच्या शेजारील शेतक-यांना त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला.

‘शासनाचेदुर्लक्ष’ : आत्महत्येनंतरशिवहरी ढोक यांच्या खिशात दोन चिठ्ठ्या सापडल्या. एका चिठ्ठीवर ‘अतिवृष्टीने पूर्णत: घर पडले असून मला लाभ फक्त रुपये २,४०० मिळाला शासनाचेच दुर्लक्ष’ तर दुस-या चिठ्ठीत ‘वाढता प्रपंच दुष्काळी परिस्थिती त्यामुळे मला माफ करावे यात कोणाचाही दोष नाही, आपला...’ असा मजकूर लिहिला आहे.

स्वाभिमानीशेतकरी संघटनेचा तहसीलदारांसाठी आग्रह : जोपर्यंततहसीलदार बाळासाहेब तिडके घटनास्थळावर येत नाहीत, तोपर्यंत शिवहरी ढोक यांचा मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका देवेंद्र भुयार यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तहसीलदार निवडणुकीत व्यस्त असल्याचे सांगून नायब तहसीलदार एम. के. असनानी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ढोक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.

हेलावणारा तीन मुलींचा आकांत
ढोकयांच्यामागे पत्नी रमाबाई, वरुडच्या महात्मा फुले महाविद्यालयात दुस-या वर्गात शिकणारी डिंपल, नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली श्वेता आठवीत शिकणारी संपदा अशा तीन मुलींचा परिवार आहे. वडिलांच्या मृत्यूची बातमी एेकून तीनही मुलींसह पत्नींचा आकांत समाजमन हेलावून टाकणारा होता. आकांत पाहणा-या गावक-यांच्याही डोळ्यांत ही भीषण अवस्था पाहून अश्रू तरळत होते. शेताच्या भरवशावर उदरनिर्वाह कठीण झाल्यामुळे त्यांनी स्वत:ला संपवले.