आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाचा अनियंत्रित बाजार शेतकरी राजा झाला बेजार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - ग्रामीण भागातील व्यापार्‍यांचे अनियंत्रित वजनकाटे व कापसात घेतल्या जाणार्‍या घटीच्या माध्यमातून कापूस उत्पादकांची सध्या मोठी लूट सुरू आहे. परंतु, या अनियंत्रित बाजारावर काटेकोर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नसल्याने कापसाला चांगले दर असूनही त्याचा फायदा शेतकर्‍यांना होत नसल्याचेच दिसून येत आहे.

सध्या कापूस बाजारात तेजीचे वातावरण आहे. परंतु, ग्रामीण भागात कापसाच्या लुटीसाठी नेहमीप्रमाणे विविध यंत्रणा सक्रिय झाल्याने शेतकर्‍यांना भावाचाही फायदा मिळू शकत नसल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात व्यापार्‍यांकडून खरेदी केला जात असलेला कापूस तराजूने मोजला जातो. 20 किलोच्या वजनाने ही तोलाई होते. परंतु, शेतकर्‍याने जर व्यापार्‍याला थेट गाडी भरून प्लेट काट्यावर वजनाची मागणी केली, तर यास व्यापारी नकार देत आहेत. तराजूच्या वजनात मोठय़ा प्रमाणात कापूस चोरण्यास वाव असल्यामुळे व्यापारी थेट प्लेट काट्यावर वजन करण्यास तयारच होत नाही. याबाबत दाद मागण्यासाठी कोणतीच यंत्रणा सक्रिय नसल्यामुळे शेतकर्‍यांना नाहक फटका बसत आहे. त्यामुळे नाइलाजाने शेतकर्‍यांना तराजूनेच कापूस मोजून द्यावा लागत आहे.

शेतकर्‍यांच्या मालावर घट का?
कोणत्याही होलसेल दुकानात वा बाजारात शेतमाल व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यासाठी गेल्यास व्यापारी ही घट देत नाहीत. मग शेतकर्‍यांकडूनच ही घट का घेतली जाते, असा प्रश्न शेतकर्‍यांकडून विचारला जात आहे. या घटीच्या माध्यमातून हजारो क्विंटल कापूस काही व्यापारी फुकट लुटून नेत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, सध्या आधुनिक अचूक वजनयंत्रे असल्यानंतरही ही घट का, असा प्रश्न कायम आहे.

एका व्यापार्‍याने लुटला शेकडो क्विंटल कापूस
चांदूरबाजार तालुक्यात शिरजगाव बंड येथील एका दलालाच्या माध्यमातून काही व्यापार्‍यांच्या टोळीने तराजूवर हातचलाखी करून शेकडो क्विंटल कापूस चोरून नेला होता. मागील वर्षी बाजारात कापसाचे भाव केवळ 3950 असताना टोळक्याने 4200 रुपये दराने कापूस खरेदी केला. भाव जादा मिळत असल्याने शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात कापूस विकला. व्यापार्‍यांनी कापूस नेल्यानंतर आपला कापूस कमी भरल्याचे शेतकर्‍यांच्या लक्षात येत होते. दरम्यान, दुसर्‍या दिवशी शेतकर्‍यांनी या मापार्‍याला 20 किलोच्या वजनावर सात किलो कापूस चोरताना रंगेहाथ पकडले व चांगलाच चोप दिला होता.

व्यापार्‍याचे पाणी
काही व्यापारी शेतकर्‍यांच्या घरून कोरडा खणखणीत कापूस खरेदी करतात व त्याच्या दारात त्याच्याच घरातील पाणी घेऊन फवारणी पंपाने प्रत्येक 20 किलोच्या वजनावर पाणी मारतात. परंतु, शेतकर्‍यांच्या कापूस जरासाही ओला असला, तर व्यापारी सर्रास 500 रुपयांनी भाव पाडून शेतकर्‍यांची लूट करतात.

लूट गंभीर विषय
ग्रामीण भागात काही खासगी व्यापार्‍यांकडून होणारी शेतकर्‍यांची लूट हा चिंतेचा विषय आहे. या व्यापार्‍यांवर नियंत्रण ठेवणे कठीण काम आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. नानासाहेब चव्हाण, उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ.

यार्डात हवी खरेदी
चढय़ा भावाचा शेतकर्‍यांना फायदा होण्यासाठी कापसाची खरेदी बाजार समितीच्या यार्डातच होणे आवश्यक आहे. परंतु, समित्याच्या उदासीन धोरणांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. याचा गांभीर्याने विचार व्हावा. भय्यासाहेब निर्मळ, माजी संचालक, बाजार समिती.