आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांसमोर नवे संकट: अमरवेलीचा विळखा, तूर, मूग, सोयाबीन बुडण्याच्या वाटेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अतिवृष्टी व पूरस्थितीने होरपळून निघालेल्या मूग, सोयाबीन, तूर व तत्सम पिकांपुढे अमरवेल हे नवे संकट उभे ठाकले आहे. या तणसदृश वनस्पतीच्या विळख्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त झाले असून उभे पीक बुडण्याच्या वाटेवर आहे.

अमरवेल ही परजिवी वनस्पती असल्यामुळे ती शेतात लावलेल्या पिकांतील हरितद्रव्य शोषून घेते. परिणामी, पिकांची वाढ खुंटते आणि उत्पन्न बुडते, असा शेतकर्‍यांचा अनुभव आहे. प्रगतिशील शेतकरी आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोड यांनी हा मुद्दा कृषी विभागाचे सहसंचालक, कृषी अधीक्षक आणि ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक व उपसंचालक यांच्या निदर्शनास आणून दिला. प्रत्यक्ष पाहणीनंतर त्यांनी ही बाब मान्य केली आहे.

अमरवेलीच्या प्रभावाने शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे, हेही मान्य केले आहे. प्रारंभीच्या काळात सोयाबीन व मुगावर या तणाने आक्रमण केले. आता त्याची पाळेमुळे तुरीवर पसरू लागली आहेत. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मुगाचे अख्खे पीक आधीच नेस्तनाबूत झाले. सोयाबीनलाही या संकटाचा मोठय़ा प्रमाणावर फटका बसला. त्यातून सावरण्याच्या प्रयत्न करीत असतानाच शेतातील पिकांना आता अमरवेलीने विळखा घातला आहे. भातकुली तालुक्याला घेरणार्‍या या तणाने हळूहळू जिल्हाभरात प्रसारास सुररुवात केली आहे. त्याला वेळीच आवर न घातल्यास जिल्हाभरातील शेतकरी अडचणीत येण्याची भीती आहे.

नावातच ‘अमर’, मग मरणार कशी ?
या तणसदृश वनस्पतीच्या नावातच ‘अमर’ (अमरवेल) आहे. त्यामुळे ती मरणार कशी, असा गमतीशीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरे म्हणजे या तणाला स्वतंत्रपणे नष्ट करण्यायोग्य औषधच नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एखाद्या जालीम औषधाची फवारणी केली, तर पिके उद्ध्वस्त होण्याचा धोका संभवतो.

फवारणी केल्यास पिके वाचविता येतात
अमरवेलीचा विळखा जिल्हाभर पसरल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांसमक्ष झालेल्या बैठकीतही हा मुद्दा समोर आला होता. एक लिटर द्रावणात तीन मिलि टरका सुपर व प्रत्येकी तीन ग्रॅम अमोनियम सल्फेट आणि स्टिकर (साबणाचे पावडर) फवारणी केल्यास पिके वाचवता येऊ शकतात.
-प्रकाश सांगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

तणसदृश वनस्पतीचा शोध घेणे आवश्यक
ही तणसदृश वनस्पती आली कोठून, याचा शोध घेणे आवश्यक आहे. काँग्रेस गवत ज्याप्रमाणे गव्हातून पसरले होते. कदाचित तसे तर नाही ना, यादृष्टीनेही बघायला हवे. कृषी विभागाच्या संशोधन यंत्रणेने ही बाब हुडकून काढावी, अन्यथा शेतकर्‍यांचे काही खरे नाही.
-प्रमोद शेलोरकर, शेतकरी, शिराळा, ता.जि. भातकुली.