आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाफेडचे साडेसहा कोटी मिळणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील हरभरा, तूर व हरभरा खरेदीचे अद्यापही नाफेडकडे थकीत असलेले शेतकर्‍यांचे अंदाजे साडेसहा कोटी रुपये येत्या काही दिवसांत मिळण्याचा आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेतकर्‍यांचे पैसे देण्यासाठी 50 कोटी रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

बाजार समित्यांमध्ये शेतमालाची कमी दराने खरेदी होऊन शेतकर्‍यांची लूट होऊ नये म्हणून नाफेडच्या वतीने हमीभावाने भुईमूग, तूर व हरभर्‍याची खरेदी करण्यात आली होती. यातील अंदाजे साडेसहा कोटी रुपये अद्यापही नाफेडने अदा केलेले नाहीत. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकार्‍यांकडून मागील सात-आठ महिन्यांपासून रक्कम मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. परंतु मुंबईचे अधिकारीच दाद देत नसल्यामुळे शेतकर्‍यांना पैसे मिळू शकले नाही. दरम्यान, यावर्षी सुरुवातीला अतिवृष्टी, त्यानंतर गारपीट व आता पावसाच्या खंडामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आला होता.
जनप्रतिनिधींनीही वारंवार पाठपुरावा करूनही चुकारे होऊ शकले नव्हते. दरम्यान, शेतकर्‍यांचे पैसे त्वरित मिळावे, यासाठी आमदार बच्चू कडू यांनी 22 जुलै रोजी मार्केटिंग फेडरेशनच्या कर्मचार्‍यांना कार्यालयात कोंडले होते. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास पणनच्या सरव्यवस्थापकांनी 23 लाख रुपयांचा धनादेश व 50 लाख रुपये उपलब्ध करून दिले होते; परंतु अद्यापही उर्वरित रक्कम अदा करण्यात आलेली नाही. दरम्यान, नाफेडने खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे शेतकर्‍यांना त्वरित मिळावे, यासाठी 50 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय शासनाने 31 जुलै रोजी घेतला आहे. शेतकर्‍यांचे पैसे विलंबाने मिळत असल्याने त्यासाठी 50 कोटी रुपयांची शासन हमी सहा महिन्यांसाठी मिळावी, अशी विनंती पणन महासंघाने केली होती. शासनाच्या निर्णयामुळे शेतकर्‍यांची थकीत रक्कम येत्या काही दिवसांत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

तूर विकण्याचा फेडरेशनचा प्रस्ताव
सध्या तुरीचे दर पाच हजार रुपयांवर पोहोचले आहेत. नाफेडने जिल्ह्यात 26 हजार 426 क्विंटल तूर 4,300 रुपये हमीभावाने खरेदी केली होती. शेतकर्‍यांचे तुरीचे पैसे अद्यापही थकले असून, सध्या भाव चांगले असल्यामुळे नाफेडने तूर विकण्याचा प्रस्ताव जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाच्या वतीने वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठवला आहे.