आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers News In Marathi, Ghatanji Taluka, Divya Marathi, Yavatmal

वृद्ध शेतकर्‍याची तब्बल सात वर्षांपासून मदतीसाठी पायपीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - घाटंजी तालुक्यातून वाहणार्‍या वाघाडी नदी तिरावरील शेताचे पुरामुळे नुकसान झाले होते. परिणामी, बाधितांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. यातून सावरण्यासाठी मदत मिळावी यासाठी आमडी येथील नामदेव काशिनाथ लिंगायत हे 69 वर्षीय शेतकरी मागील सात वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत, परंतु न्याय मिळालेला नाही. यासंदर्भात त्यांनी 25 मार्च रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.


लिंगायत यांचे आमडी शिवारात गट क्र. 50 मध्ये शेत आहे. 2006 मध्ये त्यांनी या शेतात कपाशीचे पीक घेतले. मात्र, वाघाडी नदीच्या पुरामुळे पिकासह शेतातील नोझल, पाइप वाहून गेले तर मोटर खराब झाली आहे. शासनाने पूरपीडितांसाठी मदत जाहीर केली. मात्र, लिंगायत यांना याचा लाभ मिळाला नाही. त्यांनी घाटंजी तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांना अनेकदा निवेदन दिले, परंतु त्याला केराची टोपली दाखवण्यात आली.
प्रशासनातील अधिकार्‍यांनी नुकसान झालेल्या शेताची प्रत्यक्ष पाहणी करून मदत द्यावी, या मागणीसाठी ते जिल्हा प्रशासनाकडे वारंवार चकरा मारत आहे. ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणीवजा विनंती त्यांनी केली आहे. सात वर्षांपासून या शेतकर्‍याला मदतीच्या लाभापासून वंचित का ठेवण्यात आले, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. विशेष म्हणजे या शेतकर्‍याच्या शेताला लागून असलेल्या काही शेतकर्‍यांना मदत मिळाली आहे. मात्र, त्यांनाच मदतीपासून डावलण्यात आले आहे.