आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णानगरमध्ये दोन गटात हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- संशयास्पदरीत्या फिरणार्‍या पाच युवकांना परिसरातील नागरिकांनी हटकल्याने रामपुरी कॅम्पमधील कृष्णानगर परिसरात रविवारी रात्री काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेनंतर गाडगेनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एजाज खान अजीज खान (40, रा. गुलिस्तानगर) आणि सै. अझरुद्दीन सै. जमालउद्दीन (26, रा. जमील कॉलनी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. रविवारी एजाज, अझरुद्दीन यांच्यासह पाच युवक दुचाकीने कृष्णानगरमध्ये आले. या वेळी परिसरातील महिला व तरुणी दीपावली निमित्त एकमेकांना शुभेच्छा देत होत्या.

या प्रसंगी पाच जणांनी त्यांची छेड काढून वाद घालायला सुरुवात केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यांना हटकले असता, परिसरात राहणार्‍या जितेंद्र लक्ष्मीचंद जीवतानी (40) यांच्या घरात शिरून या युवकांनी त्यांच्यासह पत्नी व त्यांच्या मुलाला धक्काबुक्की केली. जीवतानी यांनी या गुंडांना प्रतिकार केला आणि गाडगेनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यापूर्वीच एजाज आणि अझरुद्दीनचे आणखी पाच सहकारी कृष्णानगरात दाखल झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी नागरिकांना शांत करत एजाज, अझरुद्दीन यांना ताब्यात घेतले; तसेच त्यांच्या तीन दुचाकीही जप्त केल्या.

परिसरात दुस्र्‍या भागातील युवक नेहमीच गोंधळ घालत असल्याचे या प्रसंगी नागरिकांनी पोलिसांना सांगितले. या प्रकाराने संतापलेल्या कृष्णानगरवासीयांनी उशिरा रात्री गाडगेनगर ठाण्यात गर्दी केली होती. पोलिसांनी सोमवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी जितेंद्र जीवतानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दंगा, अश्लील शिवीगाळ, मारहाण, असभ्य वर्तन केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल केला.