आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळच्या युवकाने घेतला पर्यावरण संवर्धनाचा वसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - शिक्षण इलेक्ट्रिक डिप्लोमाचे घेत असले तरी वीज उपकरणांपेक्षा अंतरीचे कनेक्शन हे निसर्ग, पर्यावरण, वृक्ष यांच्याशीच जुळलेले. त्यातून दिवसेंदिवस होणारा पर्यावरणाचा -हास व बिघडत असलेले निसर्गाचे संतुलन रोखण्यासाठी एका युवकाने अंगी असलेल्या बीज संकलातून रोपटे करण्याच्या कौशल्याचा उपयोग समाजासाठी करण्याचा वसाच घेतला असून, शुक्रवारी तयार केलेल्या शंभर रोपट्यांचे वाटप तो करणार आहे. पुढील वर्षी एक हजार रोपट्यांचे वाटप करण्याचे ध्येय समोर ठेवून त्या दिशेने कामही सुरू केले आहे.

साईबाबानगरात राहणारा प्रफुल्ल नरेंद्र धोटे, असे त्या ध्येयवेड्या युवकाचे नाव आहे. त्याचे पर्यावरण प्रेम हे साईबाबानगरासह हनुमाननगर परिसरातही परिचित आहे. बारावी झाल्यानंतर कोहिनूर इन्स्टिट्यूट येथे इलेक्ट्रिकल डिप्लोमाचे शिक्षण घेत असलेल्या प्रफुल्लच्या घरी मेस चालते. त्याच मन मात्र, निसर्गातच रमलेले. झाडांची प्रचंड आवड. त्यातून बीजांपासून रोपटे करायचे कौशल्य तो शिकला. घरात तयार केलेले रोपटे ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे प्रफुल्ल त्याचे काका कालिदास धोटे यांच्या घरी जाऊन तो ते काम करतो. यामध्ये काकाही वृक्षसंवर्धनाच्या कामात सहकार्य करीत असल्याचे प्रफुल्लने सांगितले. घरीच बिया जमा करून त्याचे रोपटे करायचे आणि ते नि:शुल्क वाटायचे हा प्रफुल्लचा नित्यक्रम सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो हे कार्य करीत आहे. शिक्षणासोबतच सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम प्रफल्ल करीत आहे.

शंभर झाडे वाटणार : 4 जुलै रोजी मंजूषा मंगल कार्यालयात ज्येष्ठ नागरिक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली आहे. याठिकाणी प्रफुल्ल शंभर झाडांचे रोप वाटप करणार आहे. यामध्ये 80 झाडे फणसाची, तर 20 झाडे कडुनिंबाची आहे. ही सर्व झाडे त्याने स्वत: तयार केलेली आहेत.
‘दिव्य मराठी’चे कौतुक
‘दिव्य मराठी’नेसुद्धा वृक्षारोपणाचे आवाहन केले आहे. या आवाहनाला साद देत त्याने शंभर झाडे वाटण्याचा संकल्प केला. त्या अनुषंगाने प्रफुल्ल याने तयार केलेली झाडे तो ज्येष्ठ नागरिकांना वाटप करीत आहे. कार्यालयात येऊन प्रफुल्लने ही माहिती दिली.

रोपट्यांची निर्मिती : कडुलिंबाच्या निंबोण्या आणून प्रफुल्ल स्वत:च घरी झाडे तयार करतो. फणसाची झाडेसुद्धा अशाच पद्धतीने तो तयार करतो. झाडांसाठी चांगली माती आणणे याव्यतिरिक्त घरीच खतांची निर्मिती करून झाडांचे तो संगोपन करतो. यानंतर प्रामुख्याने पावसाळ्यात ही झाडे तो नि:शुल्क वाटप करतो.