आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसावाहू मालगाडीच्या वॅगनमध्ये ठिणगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- हावडा-मुंबई मार्गावर कोळसा वाहून नेत असलेल्या मालगाडीच्या वॅगनमध्ये ठिणगी पडल्यानंतर कोळशाने पेट घेतला. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. रेल्वे कर्मचारी, अग्निशमन दलाने वेळीच धावाधाव केल्याने मोठा अनर्थ टळला.

हावडा येथून मुंबईला दगडी कोळसा वाहून नेत असलेली 58 वॅगनची मालगाडी शुक्रवारी सकाळपासून बडनेरा रेल्वे यार्डात उभी होती. डब्यापासून इंजिनकडे असलेल्या 24 व्या वॅगनमधून धूर निघत असल्याचे गार्डच्या लक्षात आले. त्याने याबाबत वॉकीटॉकीवरून चालकाला सूचित केले. चालक आणि गार्ड दोघांनीही वॅगनजवळ येऊन पाहिल्यानंतर शंटिंगजवळून धूर येत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे कोळसा पेटला असावा, असे त्यांनी बडनेरा रेल्वे स्थानकाच्या उपप्रबंधकांना बिनतारी संदेशाने कळवले. बडनेरा येथून अग्निशमन दलासही सूचित करण्यात आले. रेल्वेचे अधिकारी, रेल्वे पोलिस पथक आणि अमरावतीहून अग्निशमन दलाचा बंब बडनेरात दाखल झाला. कोळशाच्या वॅगनवर पाण्याचा मारा करून पेटलेली ठिणगी विझवण्यात आली. आग पूर्णपणे विझल्याची खात्री झाल्यानंतर रेल्वेच्या अधिकार्‍यांनी मालगाडीची संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर यार्डातून ही गाडी पुढे काढण्यात आली. दरम्यान, या संदर्भात अधिकृत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, रेल्वेचे अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाही. मालगाडीच्या एका डब्यातून धूर निघत असल्याची माहिती तेवढी रेल्वे पोलिसांनी दूरध्वनीवरून दिली.

सतर्कतेमुळे टळला अनर्थ
कोळशाची वॅगन पेटल्याची ही बडनेरा रेल्वे स्थानकावरील अलीकडच्या काळातील चौथी घटना आहे. यापूर्वी एकदा इंधनवाहू मालगाडी रुळावरून घसरली होती. त्यात पेट्रोलियमचा मोठा साठा होता. रेल्वे कर्मचार्‍यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्यावेळीदेखील मोठा अनर्थ टळला होता.

वाहतूक सुरळीत
मालगाडीच्या कोळशाच्या वॅगनला लागलेल्या आगीमुळे मुंबई, नागपूर मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही, असे भुसावळ येथील रेल्वे नियंत्रण कक्षाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. खबरदारीचा उपाय म्हणून बडनेरा स्थानकाच्या जवळपास असलेल्या प्रवासी रेल्वे गाड्यांचा वेग कमी करण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या होत्या. परंतु, त्यामुळे वेळापत्रक कोलमडले नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले.