आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्‍याची दिशा बदलली म्हणून वाचले गाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगावसुर्जी- गावालगत अचानक लागलेल्या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण केले. तासभरातच वार्‍याचा वेग वाढल्याने आगीने गावाच्या एका बाजूला घेरले. वैरण, शेती साहित्य, इंधन आणि गोवर्‍याही खाक झाल्या. आगीची भीषणता पाहून काहींनी घरातील साहित्य बाहेर काढणे सुरू केले. मात्र, तेवढय़ात वेगाने वाहणार्‍या वार्‍याने दिशा बदलली आणि गाव आगीत भस्मसात होण्यापासून वाचले. आगीचा हा थरार तालुका मुख्यालयापासून 15 किमी अंतरावरील कोठा कमालपूर ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. 1) दुपारी अनुभवला.
जेमतेम दीड हजार लोकसंख्येच्या कोठा कमालपूर येथील नागरिक उन्हाळय़ात गावालगत शेतातील साहित्य, बैलगाड्या, इंधन, गोवर्‍याचे ढीग लावून ठेवतात. या भागात मोठय़ा प्रमाणात बाभळीची झाडे असल्याने जनावरेही दुपारच्या वेळी विसावा घेतात. याच भागात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागल्याने गावकर्‍यांची एकच धावपळ झाली. जोरदार वारा वाहत असल्याने आग पसरण्याची भीती लक्षात घेता, अनेकांनी घरातील साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. परंतु, अचानक वार्‍याने दिशा बदलली. त्यामुळे मोठी हानी टळली. परंतु, या आगीत वर्षभराचे इंधन, वैरण खाक झाले. जनावरे चरण्यासाठी रानात सोडल्यामुळे त्यांचेही प्राण वाचले.आगीची माहिती मिळताच कोकर्डा येथील निवृत्ती बारब्दे यांनी सहकार्‍यांसमवेत मदतीसाठी धावून आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब हिंगणीकर व रूपेश गणात्रा यांनी अंजनगाव व अचलपूर येथील अग्निशमन विभागाला सूचित केले. अंजनगावसुर्जी येथील पथक आधी, तर तासाभराने अचलपूर येथील अग्निशमन बंब पोहोचले. चार तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. आगीत लाकडे जळाल्याने रात्रभर त्यावर पाण्याचा मारा सुरू राहणार असल्याचे पथकाने सांगितले.