आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धान्य गेले, पैसेही गेले; भीषण आगीत झाली चौदा घरे खाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगावसुर्जी - ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागलेल्या भीषण आगीत तालुक्यातील गावडगाव येथे तब्बल चौदा घरे भस्मसात झाली. नागरिकांच्या डोळ्यांदेखत जीवनावश्यक वस्तूंसह लाखोंची रोकड, महत्त्वाची कागदपत्रे जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पहाटे साडेतीनच्या सुमारास लागलेली आग अग्निशमन विभाग तसेच नागरिकांच्या मदतीने पहाटे सात वाजता आटोक्यात आली. ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

ही चौदा घरे ढोकणेपुरा परिसरातील असून, विद्युत खांबावर ‘शॉर्ट सर्किट’ होऊन अशोक ढोकणे यांच्या घरावर ठिणगी पडली. घराला आग लागल्याचे लक्षात येताच ढोकणे कुटुंबीयांनी आराडाओरड सुरू केली. नागरिकांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करून एकामागे एक, चौदा घरे कवेत घेतली. यामध्ये अशोक ढोकणे, दिलीप ढोकणे, मधुकर ढोकणे, बाळू ढोकणे, श्रीराम ढोकणे, दादाराव ढोकणे, विनायकराव ढोकणे, गजानन चापके, विष्णू चापके, रामदास मारबते, अशोक ढोकणे, नारायण ढोकणे, विठ्ठल मारबते, वर्षा भोरे यांची घरे

उपचारासाठीचे सव्वा लाख जळाले
पती व वडिलांचे छत्र हरवलेल्या वर्षा प्रवीण भोरे या आपल्या निराधार आईसोबत येथे वास्तव्यास होत्या. आईच्या आजारासाठी शेती विकून बँकेत ठेवलेली तब्बल एक लाख 25 हजारांची रोख घरातील पेटीत ठेवली होती. या रकमेसह महत्त्वाची कागदपत्रेही आगीत जळून खाक झाल्याने उपचाराचा प्रश्न उभा ठाकला आहे.
सरसावले मदतीचे हात
बळवंत वानखडे यांनी आगग्रस्त कुटुंबाला एक हजार रुपयांची मदत दिली. सरपंच, सदस्यांनी दोन हजार, युवा सेनेचे तालुकाप्रमुख कपिल देशमुख यांनी प्रत्येकी एक हजार आणि आमदार अभिजित अडसूळ यांच्यामार्फत त्यांचे स्वीय सहायक रूपेश गणात्रा यांनी दहा कुटुंबीयांना प्रत्येकी सात टिनांची मदत दिली, तर नायब तहसीलदार विजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी गायकवाड आदींनी अन्न, धान्य उपलब्ध करून दिले. सर्वांनीच कठीण प्रसंगी माणुसकीचा परिचय देत त्या कुटुंबांना आधार दिला आहे.