आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire News In Marathi, Garment Store, Amravati, Divya Marathi

कापड दुकानाला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - परतवाडा शहरातील भरवस्तीत असलेल्या कापड दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह सात जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन जण किरकोळ जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि. 29) मध्यरात्री अडीच वाजता घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मृतांत विमल रमेश गोठवाल (54), पूनम आनंद गोठवाल (30), वेद आनंद गोठवाल (4), वेदिका आनंद गोठवाल (4 महिने), रवी रमेश गोठवाल (30), निकिता रवी गोठवाल (25), शीतल अरविंद गोठवाल (28) यांचा समावेश आहे. रमेश गोठवाल, आनंद गोठवाल, अरविंद गोठवाल हे किरकोळ जखमी झाले असून या अपघातातून ते सुखरूप बचावले.


परतवाडा शहरात अत्यंत गजबजलेल्या श्रीनिवास मार्गावर तीन वर्षांपूर्वी गोठवाल कुटुंबीयांनी वृंदावन फॅशन हे तीन मजली होलसेल कापड दुकान सुरू केले होते. तळमजल्यावर कापडाचे दुकान, रमेश व पत्नी विमल राहत होते. दुसर्‍या मजल्यावर रवी व पत्नी निकिता, तर तिसर्‍या मजल्यावर रमेश यांचे पुतणे आनंद, पत्नी पूनम, मुले वेद, वेदिका दुसरे पुतणे अरविंद, पत्नी शीतल राहत होते. रात्री अडीचच्या सुमारास रमेश गोठवाल यांना जाग आली. त्यांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी पत्नी विमल यांना उठवले व बाहेर येण्यास सांगितले. दोघेही बाहेर आल्यानंतर रमेश यांनी आरडाओरड करून इतरांना उठवण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान ‘मेरे बच्चे अंदर है’ असे म्हणत विमल या पुन्हा आत गेल्या. आगीने सर्व घर वेढल्याने जिन्यावरच विमल यांचा होपरपळून मृत्यू झाला. आरडाओरडा ऐकून तिसर्‍या मजल्यावर झोपलेले आनंद आणि अरविंद यांना जाग आली. गोठवाल कुटुंबांचेच नातेवाईक डॉ. गोठवाल यांचा मुलगा आर्यन घटनेच्या रात्री गोठवाल यांच्या घरी झोपण्यासाठी आला होता. जाग आल्यामुळे आनंद व अरविंद यांनी आर्यन याला गच्चीवरून उडी घेऊन शेजारच्या घरी पाठवत आपल्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी ते पुन्हा परत आले. तोपर्यंत आगीने तिसरा मजलाही आपल्या कवेत घेतला होता.


उड्या मारल्याने बचावले
तिसर्‍या मजल्यावरील पूनम, वेद, वेदिका व शरतल यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आनंद व अरविंद यांनी गच्चीवरून शेजारच्या घरी उड्या घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. दरम्यान, या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून रविवारी सायंकाळी अत्यंत शोकाकुल परिस्थितीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


अग्निशमन दलाला व्यत्यय
मध्यरात्री अडीच वाजता आग लागल्यानंतर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. त्यानंतर एक बंब घटनास्थळावर पोहोचला तर दुसरा अर्धा तास उशिराने पोहोचला. आग लागलेले घर अंत्यंत दाट लोकवस्तीत असल्याने बंबांना घटनास्थळी पोहोचण्यास व्यत्यय येत होता. अखेर तासाभरानंतर बंब घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करून जवानांनी ही आग आटोक्यात आणली.


दिवसभर बाजारपेठा बंद
गोठवाल कुटुंब सर्वांशी हसत खेळत राहत होते. त्यामुळे अचानक घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे परतवाडा व अचलपूर शहरातील बाजारपेठा बंद ठेवून नागरिकांनी दुखवटा पाळला. रविवारी दिवसभर या आगीची शहरभर चर्चा होती.