आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरातील चांदणी चौकत गोळीबार, नंतर पोलिस ठाण्यातच ‘फ्री स्टाइल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - चांदणी चौकात रविवारी दुपारी टोळीयुद्धातून दोन गटांमध्ये झडलेल्या चकमकीनंतर गोळीबार झाला. भरदुपारच्या थरारनाट्यानंतर एका टोळीतील सदस्य नागपुरी गेट ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचले. दुसऱ्या टोळीतील एक सदस्यही तेथे पोहोचल्यावर संघर्ष शिगेला पोहोचून विरोधी टोळ्यांमधील दोघांमध्ये पोलिस ठाण्याच्या गेटवरच हाणामारी झाली. पोलिसांनी संबंधित दोघांनाही अटक करून जमलेल्या जमावाला पांगवले.

शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या वादातून गोळीबार झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असले, तरी या वादाला राजकीय कंगोरे असल्याची चर्चा नागपुरी गेट परिसरामध्ये सुरू होती. नुकत्याच आटोपलेल्या विधानसभा निवडणुकीपासून या दोन्ही गटांमधील धुसफूस वेळोवेळी बाहेर येत होती. दोन टोळ्यांमधील शत्रुत्वामुळे निर्माण झालेला संघर्षाला शनिवार रात्रीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा वाट मिळून हा वाद थेट गोळीबारापर्यंत पोहोचला.
गोळीबाराची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रिकामे काडतूस जप्त केले. तत्पूर्वी, मो. अहफाज साबिर खान हे दोघे सहकाऱ्यांसह नागपुरी गेट पोलिस ठाण्यामध्ये पोहोचले होते. साबिर तक्रार देत होता. अहफाज आपल्या सहकाऱ्यांसोबत बाहेर उभा होता. नेमका त्याचवेळी तक्रार देण्यासाठी नईम पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. नईम पोहोचताच अहफाज आणि नईम यांच्यामध्ये ‘फ्री स्टाइल’ सुरू झाली. ठाणेदार अनिल किनगे इतर पोलिस ठाण्यातच हजर होते. त्यानंतर पोलिसांसमक्ष ‘फ्री स्टाइल’ करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. नागपूरी गेट पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल केले आहेत. ‘संघर्षनाट्य’ बघण्यासाठी ठाण्याबाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
चांदणी चौक परिसरामध्ये गोळीबार झाल्यानंतर काडतूस शोधण्यासाठी दीड तासाने नागपुरी गेट पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काडतुसांचा शोध घेतला. त्यांना दोन रिकामी काडतुसे सापडली. या काडतुसांचा आकार ०.३२ मिमीचा असून, ते रिव्हॉल्व्हरचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेत सहभागींपैकी दोघे तडीपार असल्याची चर्चा होती. तडीपार असतानाही गुन्हेगार शहरामध्ये वावरत आहेत. गुन्हे करत आहेत. त्यामुळे, या प्रकरणामध्ये किती तडीपारांचा समावेश होता, याची माहिती घेऊन गंभीर कारवाई करणार असल्याचे पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.